Amit Shah held Jawaharlal Nehru responsible for POK : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबत लोकसभेमध्ये (पावसाळी अधिवशन) प्रदीर्घ चर्चा चालू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (२९ जुलै) या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी अमित शाह म्हणाले, “भारताचे पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच आज पाकव्याप्त काश्मीरचं अस्तित्व आहे. १९४८ च्या भारत-पाक युद्धावेळी नेहरुंनी एकतर्फी युद्धविराम जाहीर केला नसता तर आज वेगळी परिस्थिती असती.”

अमित शाह म्हणाले, “विरोधक सातत्याने आम्हाला प्रश्न विचारत आहेत की आपण सुस्थितीत होतो, तर पाकिस्तानबरोबर युद्ध का केलं नाही? मला त्यांना सांगायचं आहे की युद्धाचे अनेक परिणाम होतात. खूप विचार करून असे निर्णय घ्यावे लागतात.”

…तेव्हा आपण काश्मीरमध्ये घुसू शकलो असतो : शाह

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “युद्ध का केलं नाही विचारणाऱ्यांना मी या देशाच्या इतिहासातील काही उदाहरणं देऊ इच्छितो. १९४८ साली भारत – पाकिस्तान युद्ध झालं. त्या युद्धात आपल्या लष्कराने आघाडी घेतली होती. आपलं लष्कर काश्मीरमध्ये अशा स्थितीत होतं जिथून आपण पाकिस्तानमध्ये घुसू शकलो असतो. परंतु, आपले तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी युद्धविराम जाहीर केला. आपले तत्कालीन गृहमंत्री दिवंगत वल्लभभाई पटेल नेहरूंना थांबवत होते. परंतु, नेहरूंनी पटेलांचं ऐकलं नाही. नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम जाहीर करून टाकला. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाह म्हणाले, “मी खूप जबाबादारीने बोलतोय. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे सांगतोय की पाकव्याप्त काश्मीरचं आज जे अस्तित्व आहे ते केवळ नेहरुंच्या युद्धविरामामुळेच आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या स्थितीला नेहरूच जबाबदार आहेत. १९६० मध्ये देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा देखील वल्लभभाई पटेल हे घोषणा करण्यासाठी कार घेऊन आकाशवाणीच्या केंद्रावर गेले होते. मात्र, आकाशवाणीचा दरवाजा बंद करण्यात आला. १९६० मध्ये आपण पाकिस्तानबरोबर सिंधू जलकरार केला आणि सिंधू नदीचं आपल्या वाट्याचं पाणी पाकिस्तानला दिलं. सिंधू नदीच्या पाण्याच्या विषयावर, भौगोलिक रणनितीच्या बाबतीत आपण मजबूत स्थितीत होतो, तरीदेखील आपण सिंधू जलकरार केला आणि सिंधू नदीचं ८० टक्के पाणी पाकिस्तानला देऊन टाकलं.”