Amit Shah X Post on Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये स्थानिक शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थी, भारतीय समुदाय व सरकारी-प्रशासकीय प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी दिलेल्या मुलाखती किंवा केलेल्या भाषणांमधून ते त्यांची राजकीय व इतर मुद्द्यांबाबतची भूमिकाही स्पष्ट करत आहेत. मात्र, राहुल गांधी तिथे मांडत असलेल्या भूमिकांवरून आता केंद्रीय गृहमंत्री व भाजपा खासदार अमित शाह यांनी टीकास्र सोडलं आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याबाबत सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाले अमित शाह?

अमित शाह यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी अमेरिकेत केलेल्या विधानांच्या संदर्भात त्यांना व काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. “देशविरोधी बोलणं आणि देशाला तोडणाऱ्यांच्या बरोबरीने उभं राहणं ही राहुल गांधी व काँग्रेसची सवयच झाली आहे. मग तो जम्मू-काश्मीरमध्ये जेकेएनसीच्या देशविरोधी व आरक्षणविरोधी अजेंड्याला समर्थन देणं असो किंवा मग विदेशातील व्यासपीठांवर भारताच्या विरोधात बोलणं असो, राहुल गाँधींनी देशाची सुरक्षा व भावनांना कायम धक्का पोहोचवला आहे”, असं अमित शाह यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“भाषेवरून, प्रांतावरून किंवा धर्मावरून भेदभाव करणाऱ्या गोष्टी बोलणं हे राहुल गांधींच्या फुटीर विचारांचंच द्योतक आहे. राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विधान करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशाच्या समोर आणण्याचं काम केलं आहे. मनातले विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात”, अशा शब्दांत अमित शाह यांनी राहुल गांधींना व काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

Rahul Gandhi in US: राहुल गांधींचा अमेरिकेत भाजपा व संघावर हल्लाबोल; म्हणाले, “आरएसएसला वाटतंय की…”

अमित शाह यांचा राहुल गांधींना इशारा

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमित शाह यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. “मी राहुल गांधींना हे सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजपा आहे, आरक्षणाला कुणी हातही लावू शकत नाही. भाजपा आहे तोपर्यंत देशाच्या एकात्मतेशी कुणीही खेळू शकत नाही”, असं अमित शाह यांनी पोस्टमध्ये शेवटी लिहिलं आहे. अमेरिका दौऱ्यावर राहुल गांधींनी नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीकात्मक भूमिकाही मांडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

RSS, भाजपा, मोदींना केलं लक्ष्य

राहुल गांधींनी अमेरिकेत डेलासमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आरएसएस, भाजपा व मोदींना लक्ष्य केलं होतं. “RSS ला वाटतं की भारत ही एक कल्पना आहे. आम्हाला वाटतं की भारत म्हणजे अनेक प्रकारच्या कल्पना आहेत. आम्हाला वाटतं प्रत्येकाला सहभाग घेण्याची संधी मिळायला हवी, स्वप्न पाहण्याची संधी मिळायला हवी”, असं ते म्हणाले. “लोकसभा निवडणूक निकालांच्या अगदी काही मिनिटांमध्ये देशात कुणालाही भाजपा किंवा पंतप्रधानांची भीती वाटेनाशी झाली. हे राहुल गांधी किंवा काँग्रेसचं यश नसून भारताच्या लोकांचं यश आहे, ज्यांना हे लक्षात आलंय की ते त्यांच्या राज्यघटनेवर, धर्मावर, स्वातंत्र्यावर झालेला हल्ला सहन केला जाणार नाही”, असंही ते म्हणाले.