पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेली ओळख, त्यांना आलेल्या अडचणी, आव्हानं या सगळ्याबाबत चर्चा केली आहे. ८० च्या दशकात अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची ओळख झाली. त्या आठवणीही अमित शाह यांनी सांगितल्या.

अमित शाह काय म्हणाले?

मी ८० च्या दशकाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांना भेटलो. एका कार्यक्रमासाठी ते आमच्या वॉर्डात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाचं काम हे सगळं त्यांनी खूप छान समजावून सांगितलं. मी त्यावेळी संघ स्वयंसेवक झालो होतो. देशातले तरुण संघाच्या माध्यमातून काय करु शकतो हे नरेंद्र मोदींनी त्यावेळी समजावून सांगितलं होतं. त्यामुळे मी प्रेरित झालो. संघाच्या सिद्धातांबाबत त्यांनी खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलं होतं. माझी आणि त्यांची पहिली ओळख तिथेच झाली.

नरेंद्र मोदींच्या आधी मी भाजपात आलो-अमित शाह

नरेंद्र मोदींच्या आधी मी भाजपात आलो, भाजपाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही दोघंही काम करु लागलो. सध्याच्या घडीला अशी स्थिती आहे की कोट्यवधी लोक हे समस्या निराकरणासाठी नरेंद्र मोदींकडून अपेक्षा ठेवून आहेत. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाही राष्ट्र प्रथम हीच त्यांची भावना होती. त्यानंतर पंतप्रधान झाले तेव्हाही त्यांची हीच भूमिका आहे असंही अमित शाह म्हणाले. आज तक या वृत्तवाहिनीला अमित शाह यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अमित शाह यांनी नरेंद्र मोदींच्या आठवणी सांगितल्या.

विकासाचं धोरण घेऊनच मोदी पुढे जात आहेत-अमित शाह

अमित शाह पुढे म्हणाले, नरेंद्र मोदींनी गुजरातच्या विकासासाठीही काम केलं आणि आता केंद्रात ११ वर्षांपासून ते विकासाचं धोरण पुढे घेऊन जात आहेत. ६० कोटी लोकांच्या घरी वीज पोहचवणं, शौचालय, गॅस, प्यायचं शुद्ध पाणी, दर महिन्याला पाच किलो धान्य, गरीबांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतच उपचार अशा योजनांना आकार दिला आणि त्या पूर्णत्वास आणल्या. असंही अमित शाह यांनी सांगितलं.

देशातला काश्मीर, नॉर्थ ईस्ट या ठिकाणी असलेला दहशतवाद हा सुमारे ७५ टक्के कमी करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं. दहशतवादाविरोधात इतक्या कमी कालावधीत जास्तीत जास्त कठोर पावलं उचलणं हे काम नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं. सर्जिकल स्ट्राईक असो किंवा ऑपरेशन सिंदूर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील असंही अमित शाह म्हणाले.