Amit Shah on Terrorism: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात प्रत्येत दहशतवादी कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे विधान अमित शाह यांनी केले आहे. २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमित शाह सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी या घटनेबद्दल पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे.

दहशतवाद्यांना सज्जड इशारा देत असताना अमित शाह म्हणाले, “जर कुणी एखादा भ्याड हल्ला करून हा त्यांचा विजय असल्याचे समजत असेल तर त्यांनी एक गोष्ट ध्यान्यात घ्यावी. हे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. एकेकाला वेचून सूड घेतला जाईल. देशाच्या कानाकोपऱ्यातून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. भारताच्या इंच आणि इंच जमिनीवरून दहशतवाद मुळासकट उखडून फेकू.”

दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांचा पाठिंबा मिळत असल्याचेही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. “या लढ्यात देशातील १४० कोटी जनतेसह संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभे आहे. दहशतवादाला तोंड देण्यासाठी जगातील अनेक देश एकत्र येत असून ते भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत आहेत”, असे विधान अमित शाह यांनी केले.

अमित शाह पुढे म्हणाले, “जोपर्यंत दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल, हा संकल्प मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. त्यांनी (दहशतवाद्यांनी) जे कृत्य केले, त्याची शिक्षा त्यांना मिळणारच.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरणमध्ये २२ एप्रिल रोजी भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये २५ पर्यटक आणि एक स्थानिकाचा मृत्यू झाला. अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. देशभरातून सहलीसाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी अमित शाह श्रीनगरला रवाना झाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी पहलगाम येथील हल्ल्याच्या ठिकाणी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहताना दहशतवाद्यांना धडा शिकविण्याची शपथ त्यांनी घेतली होती.