भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अमित शाह यांची निवड होण्याची शक्यता आहे. बुधवारी पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होत असून, त्यामध्ये अमित शाह यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
पक्षाचे सध्याचे अध्यक्ष राजनाथसिंह हे केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपच्या अध्यक्षपदी आता कोण येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी उत्तर प्रदेशात आखलेल्या रणनितीला घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळेच केंद्रात एकहाती सत्ता मिळवण्याचा मार्ग भाजपसाठी सुकर झाला होता. अमित शाह यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीमध्ये अमित शाह यांचा समावेश नव्हता. त्यावेळेपासून त्यांना पक्षामध्ये मोठे पद दिले जाण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली. अखेर ती खरी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत. संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर अमित शाह यांच्या नावाची घोषणा राजनाथ सिंह करण्याची शक्यता आहे.