पंजाब पोलीस ज्याचा कसून शोध घेत आहेत, त्या अमृतपाल सिंगबाबत दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्याच्या एकेक सहकाऱ्याला अटक केली जात आहे. त्यांच्याकडून अमृतपाल सिंगच्या ठावठिकाण्याबाबत वेगवेगळी माहिती पोलिसांपर्यंत पोहोचत आहे. आत्तापर्यंत त्याचे सात वेगवेगळ्या लुकमधले फोटो पोलिसांनी जाहीर केले आहेत. अजूनही अमृतपाल सिंग पोलिसांच्या हाती लागत नसताना त्याचा एक नवीन फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. अमृतपाल सिंग या फोटोमध्ये इतका निवांत दिसतोय, की पंजाब पोलीस ज्याच्या मागे हात धुवून लागलेत, तो हाच का? असाच प्रश्न कुणालाही पडावा!

गेल्या १० दिवसांपासून पंजाब पोलीस अमृतपाल सिंगच्या मागावर आहेत. जलंधरमध्ये पोलिसांनी त्याचा काही किलोमीटरपर्यंत पाठलागही केला होता. पण तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा करण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून फक्त अमृतपाल सिंग कुठे आहे, याविषयी अफवा कानावर येत आहेत. तो कुठे आहे, याची नेमकी माहिती जरी पोलिसांना मिळाली, तरी ती मिळेपर्यंत अमृतपाल सिंगनं पोबारा केलेला असतो.

दरम्यान, आता अमृतपाल सिंगचा एक नवीन फोटो व्हायरल झाल्यामुळे तो नेमका कुठे आहे याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी तो नेपाळला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे नेपाळ पोलिसांना त्यासंदर्भात कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली होती. मात्र, पंजाबमधील त्याच्या काही फोटोंमुळे त्याच्या ठावठिकाण्याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

amritpal singh (1)
अमृतपाल सिंगचा व्हायरल फोटो!

नवा फोटो, नवा लुक!

याआधी अमृतपाल सिंगचे सात लुक पोलिसांच्या दफ्तरी नोंद असताना एक नवा लुक समोर आला आहे. यामध्ये अमृतपाल सिंग एका ट्रकच्या मागे बसल्याचं दिसत आहे. यात त्याच्या डोक्यावर मरून रंगाची पगडी, डोळ्यांवर गॉगल, हातात बीअरचा कॅन आणि अंगात स्वेटशर्ट दिसत आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, याविषयी संभ्रम असला, तरी तो ताजा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या फोटोवरून हा खरंच वाँटेड आहे का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

अमृतपाल सिंगचे सात लुक; पंजाब पोलीसही चक्रावले, पुन्हा रुप बदलल्याचा व्यक्त केला संशय!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोटोत अमृतपालशेजारी त्याचा मार्गदर्शक?

दरम्यान, या फोटमध्ये अमृतपालशेजारी त्याचा मार्गदर्शक पापलप्रीत सिंग बसल्याचं दिसत आहे. पापलप्रीत सिंग याच्यावर पाकिस्तानमधील आयएसआय गुप्तचर संघटनेच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. यासोबतच त्या दोघांचा अजून एक फोटो समोर आला असून त्यात अमृतपाल आणि पापलप्रीत हे एका तीनचाकी बाईकवर बसल्याचं दिसत आहे. फरार होण्यासाठी याच बाईकचा त्यांनी वापर केला असावा, असाही संशय आहे.