नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडीत राहूनच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेसकडे पक्षविस्ताराच्या चालून आलेल्या मोठय़ा संधीकडे दुर्लक्ष न करता ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीची तयारी केली पाहिजे, असा सूर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत उमटला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महाविकास आघाडी कमकुवत झाल्याची चर्चा होत असली तरी, लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करणे हेच काँग्रेसचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे व आता शरद पवार यांना जनतेची सहानुभूती मिळू लागली आहे. राज्यातील लोक महाविकास आघाडीकडे आशेने पाहात असतील तर, काँग्रेसनेही महाविकास आघाडीसोबत लोकसभेची निवडणूक लढवणे शहाणपणाचे होईल, असा मुद्दा प्रदेश काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी मांडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी राज्या-राज्यांतील प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांशी सल्लामसलत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातील अस्थिर झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरगेंनी तातडीने राज्यातील नेत्यांना बैठकीसाठी पाचारण केले. पक्षाच्या मुख्यालयात पाच तास झालेल्या बैठकीत सद्य घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घ्यावी लागेल, असे खरगेंनी नेत्यांना ठणकावल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट केला असला तरी, पक्षामध्ये अधिकृतपणे फूट पडलेली नाही. अजित पवारांच्या गटाने पक्षनाव व घडय़ाळ या निवडणूक चिन्हावर दावा केला असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची की, अजित पवारांची हे स्पष्ट होईल. त्यामुळे नजिकच्या भविष्यातील घडामोडींवर नजर ठेवण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा गट अधिक कमकुवत झाला तर लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये काँग्रेस अधिक जागांची मागणी करू शकतो, या मुद्दय़ावरही चर्चा झाल्याचे समजते. ‘राष्ट्रवादी फुटीनंतर राज्यात पक्षाला मजबूत करण्याची मोठी संधी काँग्रेसला असून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले.

अचूक वेळी गांभीर्याने चर्चा

राज्यातील घडामोडी झाल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना जाग येते. मग, ते बैठकांचा घोळ घालतात. पण, यावेळी खरगे व राहुल गांधींनी बैठकीची अचूक वेळ साधली असल्याची प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसमधील एका नेत्याने व्यक्त केली. तर, अत्यंत गांभीर्याने आम्ही सुमारे ३० नेत्यांनी चर्चा केली. बैठकीला फोनही आम्ही बाहेर ठेवून गेले होतो, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, वर्षां गायकवाड, संजय पाटील, विजय वडट्टीवार, रजनी पाटील, प्रभारी एच. के. पाटील, मुकुल वासनिक आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

कर्नाटक निवडणुकीचे सूत्र

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूत्र महाराष्ट्रातही लागू करण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली. त्यानुसार, लोकसभा निवडणुकीसाठी आखणी करण्यात आली आहे. प्रत्येक ज्येष्ठ नेत्याला लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घ्यावी लागेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये ज्येष्ठ नेत्याच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढली जाईल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राज्यात काँग्रेस नेत्यांची संयुक्त बसयात्रा काढली जाणार आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून मंगळवारपासून भाजपविरोधात काँग्रेस पक्षाचा प्रचार सुरू होईल, अशी माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर दिली.

विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणे अशक्य?

विधानसभेत महाविकास आघाडीतील जास्त संख्याबळाच्या आधारावर काँगेरसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले पाहिजे असे मत मांडले जात
असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट अधिकृत झालेली नाही. विधानसभाध्यक्षांनी या फुटीसंदर्भात निर्णय घेऊन विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली पाहिजे. त्यामुळे काँग्रेसला अधिकृतपणे तसा दावा करता येणार नसल्याचे काँग्रेसच्या नेत्याचे म्हणणे आहे. विधानसभाध्यक्षांकडून तातडीने कोणताही निर्णय घेतला जाण्याची शक्यता नसल्याने १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहू शकेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An opportunity for congress to expand in the split of nationalists party amy
First published on: 12-07-2023 at 00:56 IST