“मी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही”; ‘या’ महिलेचा फोटो शेअर करत आनंद महिंद्रांनी व्यक्त केल्या भावना

पद्म भूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये महिंद्रांचाही समावेश आहे, तरी त्यांनी स्वत:ला यासाठी पात्र नसल्याचं म्हटलंय.

anand mahindra
आनंद महिंद्रांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना

प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन साहू,  लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्यासह अन्य मान्यवर व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात मंगळवारी पद्म पुरस्कार प्रदान केले. मंगळवारी पुरस्कार प्रदान सोहळ्याचा दुसरा टप्पा पार पडला. यावेळी सामन्यांमधील असामान्यांचाही पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यामधील एक फोटो पाहून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी आपण या पुरस्कारासाठी पात्र नसल्याचं म्हटलं आहे.

पद्म भूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये आनंद महिंद्रांचाही समावेश आहे. रामनाथ कोविंद यांच्याकडून पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणारं एक भावनिक ट्विट आनंद महिंद्रांनी केलंय. देशातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने आनंद महिंद्रांना सन्मानित करण्यात आलं. मात्र आनंद महिंद्रांनी आपण या पुरस्कारासाठी पात्र नसल्याचंही म्हटलं आहे. इतर पुरस्कार विजेत्यांचं काम बघता आपण पात्र नसल्याचं महिंद्रा ट्विटरवरुन एक खास फोटो शेअर करत म्हणालेत.

राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलेला तुलसी गोवडा यांना पुरस्कार प्रदान करतानाचा फोटो कोट करुन महिंद्रा यांनी रिट्विट केलाय. कर्नाटमधील पर्यावरणवादी असणाऱ्या तुलसी यांनी ३० हजारांहून अधिक रोपटी लावली आहेत. तुलसी यांना पद्मश्री पुरस्कार देतानाचे अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोवर प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रांनी, “या सरकारने मागील बऱ्याच काळापासून रखडलेला निर्णय घेत पद्म पुरस्कार विजेत्यांच्या निवडीमध्ये महत्वाचा बदल केलाय. समाजातील तळागाळामध्ये काम करणाऱ्या आणि त्यासाठी आयुष्य खर्ची करणाऱ्या लोकांचा सन्मान केला जात आहे. या लोकांमध्येच मलाही पुरस्कार प्रदान करण्यात आलाय पण त्यांच्यामध्ये मी स्वत:ला या पुरस्कारासाठी पात्र समजत नाही,” असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे.

या व्हिडीओला २९०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं असून २४ हजारांहून अधिक लोकांनी हे ट्विट लाइक केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anand mahindra says he felt undeserving of his padma bhushan award here is why scsg

ताज्या बातम्या