अंदमान आणि निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर येथील नव्याने बांधलेल्या आणि अलिकडेच उद्घाटन केलेल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही आणि इतर कामांच्या दरम्यान टर्मिनल इमारतीच्या बाहेरील अतिरिक्त छताचा काही भाग कोसळला. ही घटना २२ जुलैच्या रात्रीची आहे.

टर्मिनल इमारतीच्या बाहेर वाढवण्यात आलेल्या अतिरिक्त छताखाली असलेल्या जागेत सीसीटीव्ही आणि सुशोभिकरणाची काही कामं सुरू होती. तसेच रात्री जोरदार वारा सुरू होता, त्याचवेळी छताच्या खाली असलेल्या फॉल्स सीलिंगच्या (सुशोभिकरणासाठी जोडलेला काही भाग) १० चौरस मीटरचा भाग कोसळल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

विमानतळ अधिकाऱ्याने सीएनबीसी – टीव्ही १८ ला सांगितले की, सीलिंगचा निखळून खाली पडलेला भाग दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच टर्मिनल इमारतीचं छत शाबूत आहे. केवळ बाहेर असलेल्या छताखालचा, फॉल्स सीलिंगचा काही भाग कोसळला आहे. यात विमानतळाच्या आत कशाचंही नुकसान झालेलं नाही.

पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात उद्घाटन करण्यात आलं होतं. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे टर्मिनलच्या उद्धाटनावेळी विमानतळावर उपस्थित होते.

हे ही वाचा >> “जयपूरला जाते असं सांगितलं आणि…”, पाकिस्तानात गेलेल्या भारतीय महिलेच्या पतीचा धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे टर्मिलन उभारण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने तब्बल ७१० कोटी रुपये खर्च केले आहेत. नव्या टर्मिनलची ही इमारत ४०,८०० चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर उभारण्यात आली आहे. हे नवीन टर्मिनल अंदमान आणि निकोबार बेटांच्या पर्यटनाला चालना देणारं ठरेल असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला होता.