Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील एका सरकारी आदिवासी क्रीडा शाळेत नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याने २० रुपये न दिल्याने त्याच्या वर्गमित्राचा ब्लेडने गळा चिरला आहे. या विद्यार्थ्याने मद्यधुंद अवस्थेत हा गु्न्हा केला आणि त्यानंतर पोलीस अटक करतील या भीतीने स्वतःचाही गळा कापण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने दुसऱ्या विद्यार्थ्याला झालेली जखम फार खोलवर नव्हती. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आणि धोका टळला असल्याचं सांगितलं.

आरोपीने स्वतःच्या गळ्यावरूनही ब्लेड फिरवलं. मात्र, त्याला फार मोठी जखम झालेली नाही. प्राथमिक उपचारांनंतर त्यालाही घरी पाठवण्यात आलं. आरोपी देखील अल्लुरी सीताराम राजू या जिल्ह्यातील कांथाभौनसुगुडा गावातील रहिवासी आहे. ज्याच्या गळ्यावर जखम झाली तो देखील १४ वर्षांचाच आहे. तो आराकूपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रेगा गावचा रहिवासी आहे.

या शाळेत १५० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत मुलांना अभ्यासाबरोबर व्हॉलीबॉल, अ‍ॅथलेटिक्स, धनुर्विद्या व बॅडमिंटनसारख्या खेळांचं प्रशिक्षण दिलं जातं. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की आरोपी मुलाला दारुसह इतर वाईट सवयी आहेत. त्याला अनेक प्रकारची व्यसनं आहेत.

नेमकी घटना काय?

आरोपी दारू पिऊन अराकू परिसरात फिरत असताना त्याला तिथे त्याचा वर्गमित्र दिसला. त्याने मित्राकडे २० रुपये मागितले. मित्राने नकार दिल्यानंतर त्याने त्याच्याकडील ब्लेडने मित्राचा गळा कापला. त्यानंतर पोलीस अटक करतील या भीतीने त्याने स्वतःच्या गळ्यावरही छोटा वार केला. दरम्यान, मुख्याध्यापकांनी सांगितलं की दोन्ही विद्यार्थी सुरक्षित आहेत. ज्या मुलाच्या गळ्यावर वार झाला त्याला पाच टाके पडले आहेत.

आरोपीला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं जाणार

शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, “सुदैवाने मुलाला खोलवर जखम झालेली नाही. डॉक्टरांनी सांगितलं की आता कुठलाही धोका नाही. आम्ही पोलिसांत तक्रार केली असून आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. आराकू व्हॅली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गोपाल राव म्हणाले, “तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं जाईल.”