अंमली पदार्थ विरोधी पथकांनी आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या कारवाया केल्याचं आपण ऐकलं असेल. त्यामध्ये लाखो रुपयांचे अंमली पदार्थ विभागानं पकडल्याचं वृत्त समोर येत असतं. मात्र, आंध्र प्रदेश पोलिसांनी तब्बल २ लाख किलो वजनाचा आणि ५०० कोटी रुपये किंमतीचा गांजा जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी हा सगळा गांजा जाळल्याची माहिती देण्यात आली आहे. ही आंध्र प्रदेशमधली आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे.

मिशन परिवर्तनमध्ये कारवाई

गेल्या तीन महिन्यांत आंध्र प्रदेश पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये हा २ लाख किलोचा गांजा जप्त केला आहे. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश सरकारने मिशन परिवर्तनची घोषणा केली. यामध्ये राज्यभरातल्या गांजाच्या शेतीवर कारवाई करण्यात आली. नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये हा २ लाख किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दीड हजार आरोपींना अटक

या मिशनमध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी तब्बल ८ हजार ५०० एकरवर असलेल्या गांजाच्या शेतीवर कारवाई करण्यात आली. यात आत्तापर्यंत एकूण १ हजार ३६३ गुन्हे नोंद करण्यात आले असून १ हजार ५०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ५६२ आरोपी हे इतर राज्यातून आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

विशाखापट्टनममध्ये जाळला गांजा!

आंध्र प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम जिल्ह्यातील अनाकपल्ली या ठिकाणापासून जवळच असलेल्या कोडुरु गावात हा गांजा जाळण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक डी. गौतम सावंग यांच्या उपस्थितीत हा गांजा जाळण्यात आला.