Andhra Stampede Video : आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी सकाळी भाविकांच्या चेंगराचेंगरीमध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेची हृदयद्रावक दृश्ये आता समोर आली आहेत. ही घटना घडली तेव्हाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये भविकाची जीव वाचवण्याची धडपड पाहायला मिळत आङे.
या व्यंकटेश्व स्वामी मंदिरात एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक एकत्र आले होते, त्याच वेळी ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
समोर आलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये लोक एका अरूंद पॅसेजच्या रेलिंगमध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे. हे अडकलेले लोक चेंगराचेंगरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत असून हातात पूजेचे साहित्याचे बास्केट घेतलेल्या अनेक महिला मदतीसाठी ओरडताना आणि किंचाळताना ऐकू येत आहे.
हा व्हिडीओ मन विचलित करणारा असून यामध्ये अनेक जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णवाहिकांमधून जवळच्या रुग्णालयांमध्ये घेऊन जात असतानाचे दृष्य देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना यामध्ये गमावले आहे त्यांच्याबद्दल संवेदना देखील व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना देखील केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपये इतकी मदत, तसेच जखमींना ५०००० रुपये दिले जातील असे जाहीर केले आहे.
तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एक्स वर एक निवेदन पोस्ट करून शोक व्यक्त केला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, “या दुःखद घटनेत भाविकांचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो. जखमींना जलद आणि योग्य उपचार मिळावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य आणि इतर उपाययोजनांवर देखरेख करण्याची विनंती केली आहे.”
काशिबुग्गा व्यंकटेश्वर मंदिर हे १२ एकरवर पसरलेले आहे. दूरदूरून भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. चेंगराचेंगरीनंतर मंदिर परिसरात अनेक भाविक जमिनीवर निपचित पडल्याचे दिसले. इतर भाविकांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच उपचारासाठी तातडीने रुग्णालयात त्यांना हलवले.
