Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्ताने जवळपास सर्वच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस, गिफ्ट वाटपाचा धडाका लावतात. दिवाळी जवळ आल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की यावर्षी आपल्याला किती बोनस मिळेल? खरं तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांना रोख रक्कम स्वरुपात बोनस देतात तर काही कंपन्या व्हाउचर देतात. मात्र, कंपन्यांनी दिवाळीला पुरेसा बोनस न दिल्यास काही कंपन्यांमधील कर्मचारी नाराज होत असल्याच्या घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत.

आता अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशात घडल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील फतेहाबादमधील एका टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस कमी मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. एवढंच नाही तर या कर्मचाऱ्यांनी कंपनीवर नाराजी व्यक्त करत ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी टोल प्लाझाचं गेट ओपन ठेवलं. त्यामुळे ऐन दिवाळीत हजारो वाहने टोल टॅक्स न भरताच पुढे निघून गेल्याचा प्रकार घडला. या संदर्भातील वृत्त भास्कर इंग्लिशने दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांना कमी बोनस मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करण्यासाठी टोल प्लाझाचं गेट ओपन ठेवलं. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाकडे दिवाळी बोनस मागितला तेव्हा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आणि त्यांनी टोल प्लाझाचं गेट उघडलं. त्यामुळे हजारो वाहेन टोल टॅक्स भरण्याशिवाय पुढे निघून गेले.

त्यामुळे टोल कंपनीचं तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. तब्बल दोन तास टोल वसुली थांबली होती. ही घटना आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील फतेहाबादमध्ये घडल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

सुरुवातीला टोल प्लाझा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यानंतर पोलिसांना ही बाब कळवण्यात आली आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र, पोलिसांनाही कर्मचाऱ्यांच्या मागण्यापुढे काही करता आलं नाही. त्यानंतर व्यवस्थापन आणि प्रशासनाचे अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि तोडगा काढण्यात आला.

कर्मचाऱ्यांचा आरोप काय?

फतेहाबादमधील या टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की कंपनीने दिवाळीला प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस दिला. मात्र, तो खूप कमी प्रमाणात दिला. कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला १,१०० रुपये बोनस दिला, तर मागच्या वर्षी कंपनीने ५,००० बोनस दिला होता, त्यामुळे यावर्षींही मागच्या वर्षीप्रमाणे बोनस हवा असल्याचं म्हणणं कर्मचाऱ्यांचं होतं.

दरम्यान, कर्मचाऱ्यांना दोन तास समजावून सांगण्यात आलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना १० टक्के पगारवाढ देऊ केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत टोल प्लाझावर पुन्हा काम सुरू केलं. दरम्यान, या सर्व गोंधळादरम्यान तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त वाहने टोल न भरताच निघून गेल्याचा दावा करण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.