Russian woman in Karnataka cave: कर्नाटकातील गोकर्ण येथील जंगलात नीना कुटीना (४०) नामक रशियन महिला आपल्या दोन लहान मुलींसह गुहेत राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर महिलेला गुहेतून सुरक्षितस्थळी हलविल्यानंतर आता तिने आपल्या मित्राला एक भावनिक संदेश लिहिला आहे. रविवारी मित्राला पाठवलेल्या संदेशात कुटीनाने म्हटलेकी, जंगलातील तिचे आरामदायी आणि चांगले आयुष्य आता उध्वस्त झाले आहे.
नीना कुटीनाचा व्हिसा २०१८ सालीच संपला होता. ती ज्या गुहेत राहत होती, त्या परिसरात भूस्खलनाचा धोका होता. तसेच याठिकाणी जंगली श्वापदे आणि विषारी सापांचा धोकाही होता. पोलिसांनी तिची समजूत काढत तिला सुरक्षित स्थळी येण्यास राजी केले. नीना कुटीना आणि तिच्या दोन मुलींना कारवार येथील एका आश्रमात ठेवण्यात आले असून त्यांना पुन्हा रशियात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आमचे गुहेतले शांत आयुष्य उध्वस्त झालं
नीना कुटीना यांनी आपल्या एका मित्राला आणि पोलीस अधिकाऱ्याला रशियन भाषेत एक संदेश पाठवला. यात तिने लिहिले की, आमचे गुहेतील आयुष्य अखरे संपुष्टात आले आहे. आता आम्हाला आभाळ न दिसणाऱ्या, गवत, धबधबा नसलेल्या तुरुंगात टाकले आहे. इथे झोपायला बर्फासारखी थंड कातळाची जमीन नाही. या तुरुंगात आम्ही पाऊस आणि विषारी सापांशिवाय झोपतो.
“मी अनेक वर्ष मोकळ्या आकाशाखाली, निसर्गाशी जुळवून घेत जंगलात राहिले. माझा हा प्रत्यक्ष अनुभव आणि मी मिळवलेले ज्ञान मला आपल्यासमोर मांडायचे आहे. आमच्या जंगलातील वास्तव्याच्या काळात आम्हाला एकाही सापाने दंश केला नाही. एकाही प्राण्याने आमच्यावर हल्ला केला नाही. अनेक वर्षांपासून आम्हाला फक्त माणसांची भीती वाटत होती”, असेही नीना कुटीना यांनी आपल्या संदेशात लिहिले आहे.

नीना कुटीना यांनी पुढे लिहिले की, पाऊस ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. पावसात मोकळ्या जागेत राहणे, हा एक सुखद, आनंद देणारा आणि आरोग्यदायी असा अनुभव होता. पण पुन्हा एकदा वाईटाचा विजय झाला. पण आम्हाला मनापासून वाटते की, तुम्हा सर्वांना एक चांगले आयुष्य, प्रेम आणि स्वातंत्र्य लाभो, संकुचित विचार आणि मुर्खांच्या हानिकारक कृतींपासून तुमचे रक्षण होवो.
नीना कुटीना भारतात कधी आली?
नीना कुटीनाच्या मेसेजबद्दलची माहिती देताना उत्तर कन्नड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नारायण एम. म्हणाले की, ती मानवी समाजाबद्दल खूप निराश असल्याचे दिसते. पण तिच्या आत करुणा आहे. आम्ही तिचा तपास केला असता ती व्यावसायिक व्हिसावर १८ ऑक्टोबर २०१६ ते १७ एप्रिल २०१७ पर्यंत गोव्यात राहिली होती. तिचा व्हिसा संपल्यानंतरही ती वर्षभर जास्त राहिल्यामुळे एफआरआरओ विभागाने तिला एक्झिट परमीट दिला होता.
दोन्ही मुलींचा जन्म भारतातच
यानंतर कुटीना नेपाळला गेली आणि ८ सप्टेंबर २०१८ रोजी ती पुन्हा भारतात आली. कुटीनाच्या दोन्ही मुलींचा जन्म भारतातच झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र मुलींच्या वडिलांबाबत माहिती देण्यास कुटीना यांनी नकार दिला. मुलींना जन्म देण्यासाठी तिने काही वैद्यकीय मदत घेतली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत.