जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचं निधन झालं आहे. अनिता गोयल या दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंजत होत्या. आज पहाटे तीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आर्थिक अफरताफर प्रकरणात नरेश गोयल तुरुंगात होते त्यांना पत्नीला भेटण्यासाठी नुकताच जामीन देण्यात आला होता. पत्नी कर्करोगाशी लढते आहे, या दुर्धर आजारात आपल्याला पत्नीसह राहायचं आहे अशी विनंती नरेश गोयल यांनी केली होती. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. नरेश गोयलही कर्करोगाने त्रस्त आहेत.

मुंबईतल्या रुग्णालयात अनिता गोयल यांचं निधन

नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचं मुंबईतल्या रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अनिता गोयल यांच्या पश्चात त्यांचे पती नरेश गोयल आणि मुलं नम्रता तसं निवान गोयल असं कुटुंब आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच नरेश गोयल यांनी पत्नीसह राहण्यासाठी आपल्याला जामीन मिळावा असा अर्ज केला होता. माणुसकीच्या नात्याने जामीन मिळावा अशीही विनंती त्यांनी जामीन अर्जात केली होती. ज्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी-शर्थींसह त्यांना जामीन मंजूर केला होता.

हे पण वाचा- विश्लेषण: इंडिगो विमानामध्ये प्रवाशाचे गैरवर्तन… नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात?

कॅनरा बँकेच्या फसवणुकीच्या आरोपांवरुन गोयल तुरुंगात

कॅनरा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांत नरेश गोयल अडचणीत आले. नरेश गोयल यांना ६ जानेवारी रोजी जेव्हा मुंबईच्या विशेष न्यायालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांनी न्यायाधीशांपुढे हात जोडले आणि मी तुरुंगातच मरण पावलो तर बरं होईल असं वक्तव्य केलं होतं. त्याचीही चर्चा झाली होती. आता अनिता गोयल यांचं पार्थिव मुंबईतल्या त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दीर्घ काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या आज त्यांची प्राणज्योत मालवली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६ मे रोजी नरेश गोयल यांना सशर्त जामीन

नरेश गोयल यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ६ मे रोजी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. दोन महिन्यांचा अंतरिम जामीन त्यांना मंजूर करण्यात आला. मुंबईच्या बाहेर न जाण्याच्या अटीसह इतर काही अटी आणि शर्थी घालत हा जामीन मंजूर करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. जे. जामदार यांच्या एकल खंडपीठाने कॅनरा बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २ महिन्यांचा अंतरिम जामीन नरेश गोयल यांना मंजूर केला आहे.