पीटीआय, जम्मू
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सुरू केलेली दहशतवादविरोधी मोहीम रविवारीही सुरू ठेवली. त्याअंतर्गत जम्मू आणि काश्मीर या दोन्ही विभागांमध्ये पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया करणारे स्थानिक दहशतवादी आणि त्यांचे हस्तक यांना लक्ष्य करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू विभागातील उंचावरील ठिकाणी कारवाया करणारे दहशतवादी हिवाळ्यात लपण्यासाठी सुरक्षित जागा शोधत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिल्यानंतर शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून रामबन, किश्तवार, दोडा, कथुआ, रियासी, पूंछ आणि राजौरी या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले, तसेच नाकेबंदी करण्यात आली. त्यापूर्वी शनिवारी दोडा जिल्ह्यात अनेक संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रामबन जिल्ह्यातील बनिहाल आणि गूल येथे विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली तसेच घेराबंदी केली, अशी माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस, सैन्य, ‘सीआरपीएफ’ आणि विशेष पथकांमध्ये समन्वय राखण्यात आले, तसेच सामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या मोहिमेचा भाग म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील संशयित दहशतवाद्यांचे काही नातेवाईक पाकिस्तानात असून त्यांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
