लंडनमध्ये संसदेवर हल्ला झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बेल्जियममध्ये थरार अनुभवास आला. गर्दीच्या ठिकाणी एका व्यक्तीने लोकांच्या अंगावर थेट गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. बेल्जियममधील अॅंटवर्प येथे एका बाजाराच्या ठिकाणी मूळच्या उत्तर अफ्रिकेच्या असलेल्या नागरिकाने बेदरकारपणे कार चालवून लोकांना ठार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कारवर फ्रांसचा नोंदणी क्रमांक होता.
अॅंटवर्प येथील मेइर शॉपिंग स्ट्रीटवर हा प्रकार घडला. त्याची कार समोरुन येत आहे असे पाहून लोक घाबरुन पळू लागले. हा प्रकार सुरू झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि त्या व्यक्तीला अटक केली. अॅंटवर्प चे महापौर बार्ट डी वेवर यांनी पोलिसांचे आभार मानले. पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला. असे मिशेल यांनी म्हटले. या ठिकाणी पोलीस आणि सैनिक यांचा पहारा होता.
मागील वर्षी २२ मार्च झावेनतम विमानातळावर आत्मघातकी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामध्ये ३२ जण ठार तर ३२० जण जखमी झाले होते. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याच्याबदद्ल माहिती कळली. त्याचे नाव मोहम्मद आर. असे आहे. तो फ्रांसचा रहिवासी आहे. त्याच्याकडे अनेक शस्त्र सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. अगोदर गाडीने चिरडून नंतर बाजारातील लोकांना बंदुकीने मारण्याचा त्याचा कट असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सैनिकांच्या तत्परतेमुळे त्याला आधीच अटक करण्यात आली आणि पुढील अनर्थ टळला.
मागील वर्षी विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच हा हल्ला झाला आहे. मागील वर्षी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली होती. या हल्ल्यामध्ये ३२ जण ठार झाले होते तर ३२० जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांमध्ये युरोपमध्ये सातत्याने आत्मघातकी हल्ले होत आहेत. त्यामुळे बेल्जियमने आधीच सावधनता बाळगली होती.