Lapata lady Archana Tiwari how Escaped from Family : मध्य प्रदेशमधील वकील तरुणी अर्चना तिवारी १२ दिवसांपासून बेपत्ता होती. न्यायाधीश होण्याचं स्वप्न उराशी बाळगून परीक्षेची तयारी करत असलेली अर्चना ५ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधनासाठी इंदूर-बिलासपूर नर्मदा एक्सप्रेसने कटनीला जात होती. मात्र, प्रवासादरम्यान ती अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर १२ दिवस शोध घेतल्यानंतर ती नेपाळच्या सीमेजवळ सापडली. तिला पोलिसांनी भोपाळला आणलं असून पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ उलगडलं आहे. पोलीस तपासांत समोर आलं आहे की ती बेपत्ता झाली नव्हती. ती स्वतःच पळून गेली होती.

अर्चनाला न्यायाधीश व्हायचं आहे. मात्र, तिच्या कुटुंबाची इच्छा होती की तिने शिक्षण व तिची स्वप्नं सोडून त्यांनी पाहिलेल्या एका महसूल अधिकाऱ्याशी लग्न करावं. कुटुंबाचा दबाव पाहून तिने पळून जायचं ठरवलं आणि ती नर्मदा एक्सप्रेसमधून उतरून निघून गेली, अशी माहिती जीआरपीचे पोलीस अधीक्षक राहुल कुमार लोढा यांनी दिली. अर्चनाला काठमांडूहून भोपाळला (मध्य प्रदेश) परत यायला भाग पाडणाऱ्या पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व लोढा यांनीच केलं आहे.

अर्चनाने स्वतःच रचला बेपत्ता होण्याचा कट

२९ वर्षीय अर्चनाने इंदूरमधील रहिवासी असलेला तिचा एक २४ वर्षीय मित्र आणि त्याच्या चालकाच्या मदतीने मध्य प्रदेश आणि भारत देश सोडून पळून जाण्याचा कट रचला होता. ५ ऑगस्ट रोजी तिने शेवटचा फोन तिच्या काकूंना केला होता. त्यावेळी तिने काकूला सांगितलं की ती भोपाळजवळ आहे. दुसऱ्या दिवशी तिने नर्मदा एक्सप्रेस पकडली. मात्र, गाडी कटनी दक्षिण रेल्वेस्थानकावर पोहोचली तेव्हा तिच्या सीटवर केवळ तिची बॅग बेवारस अवस्थेत पडलेली सापडली.

कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून पळून जाण्याची योजना आखली

राहुल कुमार लोढा म्हणाले, “अर्चना दिवाणी न्यायाधीश होण्यासाठीच्या परीक्षेची तयारी करत होती. तसेच ती उच्च न्यायालयात वकिलीचा सराव करत होती. मात्र, तिने हे काम सोडून लग्न करावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. यावरून तिचे तिच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर नेहमी खटके उडत होते. कुटुंबियांनी अर्चनासाठी अनेक स्थळं पाहिली होती. मात्र, तिने सगळी स्थळं धुडकावली. अखेर, अर्चनाच्या पालकांनी तिच्या मनाविरोधात एका महसूल अधिकाऱ्याशी तिचं लग्न ठरवलं. तेव्हा तिचं घरातील सदस्यांशी मोठं भांडण झालं. त्यानंतर कुटुंबाने तिला शिक्षण सोडून देण्यास सांगितलं. मात्र, अर्चना शिक्षण सोडून संसार थाटण्यास तयार नव्हती. त्यामुळेच तिने मित्राबरोबर मिळून बेपत्ता होण्याचा कट रचला, असं लोढा यांनी सांगितलं.”

“याचदरम्यान, अर्चनाची इंदूरमधील एका २४ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. ज्याला ड्रोन कंपनी सुरू करायची आहे. अर्चनाने सांगितलं की तिचा त्याच्यावर विश्वास आहे. पोलीस तपास कसा करतात याची तिला कल्पना होती. तिला वाटलं की ती ट्रेनमधून गायब झाली तर तिला शोधण्याची जबाबदारी जीआरपीची असेल आणि जीआरपी दिला शोधू शकणार नाही. तिला वाटत होतं की ती पळून जाऊ शकेल. स्वतःची ओळख बदलून दुसरीकडून राहून तिचं स्वप्न पूर्ण करू शकेल आणि एक दिवस घरी परत येऊ शकेल. अर्चनाच्या मित्राच्या चालकाने तिला इटारसी येथून पळून जाण्याचा मार्ग सुचवला. या स्थानकावर पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यांनी तिचं घड्याळ व मोबाईलची विल्हेवाट कशी लावायची याची देखील योजना आखली होती.”

तपासाची दिशा भरकटावी यासाठी वेगळं नियोजन

“५ ऑगस्ट रोजी ती नर्मदा एक्सप्रेसमध्ये चढली. नर्मदापुरम येथे तिचा मित्र एका कारमध्ये तिच्यासाठी नवे कपडे आणि बॅग घेऊन तिची वाट पाहत होता. ती कारमध्ये बसली आणि तिच्याकडे असलेला फोन व स्मार्टवॉच तिने ड्रायव्हरला दिले. या दोन्ही वस्तू त्याने मिडघाटाजवळील जंगलात फेकून दिल्या. आम्ही सुरुवातीला तिथेच तिचा शोध घेत होतो. आम्हाला वाटत होतं की ती ट्रेनमधून पडली असेल. तुला दुखापत झाली असेल. परंतु, आम्हाला फसवण्यासाठी, तपासाची दिशा भरकटावी यासाठी तिने ही योजना आखली होती. अर्चना ट्रेनमधून पडली असेल असा विचार करून आम्ही जंगलात तपास करावा अशीच योजना तिने आखली होती, ज्यामध्ये ती सुरुवातीला यशस्वी झाली.”

जीआरपी अधीक्षक लोढा म्हणाले, तिच्या बॅगेत राखी आणि रक्षाबंधन सणानिमित्त खरेदी केलेल्या वस्तू होत्या. हे पाहून सर्वांना वाटलं ती रक्षाबंधनानिमित्त घरी जातेय. मात्र, हे सगळं आमची व तिच्या कुटुंबियांची दिशाभूल करण्यासाठी बॅगेत ठेवलं होतं. जेणेकरून सर्वांनी विचार करावा की तिचा अपघात झाला आहे.

प्रसारमाध्यमांमुळे अर्चनाची योजना फसली

“इटारसीहून अर्चना व तिचा मित्र टोल बूथ आणि कॅमेरे काळजीपूर्वक टाळत वेगवेगळ्या रस्त्यांनी शुजलपूरला पळून गेले. तिला वाटलं होतं की बेपत्ता व्यक्तीचा पोलीस फार शोध घेणार नाहीत. मात्र, प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि सर्वांवरचा दबाव वाढला. देशभर या प्रकरणाची चर्चा होऊ लागली. त्यामुळे अर्चना व तिचा मित्र दोघेही घाबरले. परिणामी त्या दोघांनी मध्य प्रदेश सोडून जाण्याची योजना आखली.”

…अन् अर्चनाने देश सोडून जायची योजना आखली

“सुरुवातीला त्या दोघांनी हैदराबादला पळून जायचा विचार केला होता. कारण तिकडे हिंदी भाषिक लोक कमी आहेत. ते सहज तिथे राहू शकतात. मात्र, अर्चना बेपत्ता झाल्याची बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अर्चना व तिच्या मित्राने देश सोडून पळून जायची योजना आखली. त्या दोघांनी बुरहानपूर, जोधपूरमार्गे दिल्लीपर्यंत प्रवास केला. त्यानंतर अर्चना काठमांडूच्या विमानात चढली. मात्र, तिचा मित्र दिल्लीतच थांबला. या काळात तो त्याच्या पालकांना सांगत होता की तो इंदूरमध्येच आहे.”

राहुल कुमार लोढा म्हणाले, “अर्चनाला वाटलं की ती आमच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात तिच्या मित्राच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. तिथून हा तपास आमच्या नियंत्रणात आला. त्यातून आम्ही तिच्या मित्रापर्यंत आणि अखेर अर्चनापर्यंत पोहोचलो. आम्ही तिच्या मित्राच्या फोनवरून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ती परत यायला तयार झाली. तिने काठमांडूवरून दिल्लीला येणारं विमान पकडलं. त्यानंतर ती दिल्लीवरून भोपाळला आली. अर्चनावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस कायदेशीर सल्ला घेत आहेत.”