तुम्ही आमच्यासोबत आहात की कतारसोबत? असा प्रश्न सौदी अरेबियाच्या राजांनी पाकिस्तानला विचारत आपले कतारला एकटे पाडण्याचे धोरण आणखी पुढे रेटले आहे. सौदीचे राजे सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट झाली. या भेटीदरम्यान शरीफ यांना तुम्ही कोणासोबत आहात? असा प्रश्न सलमान यांनी विचारला आहे.

एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या बातमीनुसार, कतार संकटाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नवाझ शरीफ यांनी सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांची सौदीमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यानच पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट करावी असे सलमान यांनी म्हटले आहे. यावर उत्तर देताना, पश्चिम आशियाई देशांमध्ये उभ्या राहिलेल्या राजकीय संकटादरम्यान आम्ही कोणत्याही एका देशाची बाजू घेऊ शकत नाही असे शरीफ यांनी स्पष्ट केले आहे.

आखाती देशातील इजिप्त, सौदी अरेबिया, बहरीन युएई या सगळ्या देशांनी कतार सोबत असलेले आपले राजकीय संबंध संपुष्टात आणले आहेत. कतार हा देश दहशतवादी संघटनाना बळ देत असल्याचा आरोप या देशावर बहिष्कार घातलेल्या देशांनी केला आहे. मात्र या सगळ्या प्रकरणी पाकिस्तानने मात्र कोणतेही धोरण स्पष्ट केलेले नाही. सध्या तरी पाकिस्तानने तटस्थ राहणे पसंत केले आहे. पाकिस्तानने आपली साथ द्यावी असे सौदी अरेबियाला वाटते आहे. मात्र पाकिस्तानने आपण नेमके कोणाच्या बाजूने आहोत हे सांगण्यापेक्षा तटस्थ राहणे पसंत केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान मुस्लिम समाजात मतभेद निर्माण होतील अशा एकाही घटनेसंदर्भात कोणत्याही एका पक्षाचे समर्थन करणार नाही. सौदी अरबची भूमिका मवाळ व्हावी यासाठी पाकिस्तान आपल्या कतारवरच्या प्रभावाचा वापर करेल असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे कुवेत, कतार आणि तुर्कस्थानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आखाती देशांमध्ये जे राजकीय संकट निर्माण झाले आहे त्यावर लवकरच मार्ग काढू असे आश्वासनही शरीफ यांनी राजे सलमान बिन यांना दिले आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध आणि आत्ताच्या स्थितीबाबतही चर्चा झाली. दहशतवादाविरोधातला लढा हा सगळ्याच मुस्लिम समाजाच्या हिताचा लढा आहे असेही मत या भेटी दरम्यान सलमान यांनी मांडले आहे.