सध्या सोशल मीडियावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहेत. संबंधित कार्यकर्त्यांना बजरंग दलाकडून त्रिशूल दीक्षा आणि एअर गनचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील पोन्नमपेट येथील साई शंकर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ५ ते ११ मे दरम्यान बजरंग दलाकडून शौर्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

बजरंग दलाचे नेते रघू सकलेशपूर यांनी सोमवारी दावा केला की, संबंधित शिबिर कार्यकर्त्यांमध्ये मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं. संबंधित शिबिरात काही कार्यकर्ते बंदुकीसोबत सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सकलेशपूर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

रघू सकलेशपूर यांनी सांगितलं की, “५ मे ते ११ मे दरम्यान कोडगू जिल्ह्यातील पोन्नमपेट येथील एका खाजगी शाळेत बजरंग दलाने शौर्य कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यामध्ये ११६ जणांनी सहभाग घेतला होता. शारीरिक आणि मानसिक लवचिकता सुधारण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. पहाटे पावणे पाच ते रात्री सव्वा दहाच्या दरम्यान हे प्रशिक्षण सुरू होतं.”त्यांनी पुढे सांगितलं की, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एअर गन आणि ‘त्रिशूल दीक्षा’चं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणात वापरलेल्या एअर गन आणि त्रिशूल आर्म अॅक्टचं उल्लंघन ठरत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित प्रशिक्षण शिबिराचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने गंभीर चिंता व्यक्त केली. काँग्रेस आमदार रिझवान अर्शद यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “बजरंग दल तरुणांना धर्माच्या नावाखाली हिंसाचार घडवून आणण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे.”