Army Chief General Upendra Dwivedi on Operation Sindoor: भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी ऑपरेशन सिंदूरबाबत जाहिररित्या भाष्य केले. आयआयटी मद्रास येथील एका कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले, युद्धात नरेटिव्ह मॅनेजमेंटची महत्त्वाची भूमिका असते. याचे उदाहरण देताना ते म्हणाले, “जर तुम्ही एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला विचारले की, तुम्ही हरला की जिंकला? तर ते म्हणतील आमचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल बनले आहेत. याचा अर्थ आम्ही नक्कीच जिंकलो असू.” यानंतर त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान बुद्धिबळाच्या पटावर खेळल्या जातात तशा चाली आम्ही खेळले, असेही सांगितले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या सरकारने लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फिल्ड मार्शल म्हणून बढती दिली होती, याचे उदाहरण उपेंद्र द्विवेदी यांनी दिले. त्यांनी असेही म्हटले की, ऑपरेशन सिंदर दरम्यान केंद्र सरकारने सशस्त्र दलांना कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली होती.
पहलगाम हल्ल्यानंतर सशस्त्र दलांना मोकळीक दिली
ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देताना उपेंद्र द्विवेदी म्हणाले, २२ एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशाला धक्का बसला. दुसऱ्या दिवशी आमची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘आता खूप झाले’ असे म्हणत तीनही सशस्त्र दलांना मोकळीक दिली. आम्हाला काय करायचे आहे, ते आमच्यावर सोडण्यात आले. या प्रकारचा आत्मविश्वास, राजकीय दिशा आणि राजकीय स्पष्टता आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो.
जेव्हा आम्ही पंतप्रधान मोदींना भेटलो
उपेंद्र द्विवेदी पुढे म्हणाले, २५ तारखेला आम्ही सात ते नऊ लक्ष्य निर्धारित केले होते. त्याबद्दल योजना तयार केली आणि त्याप्रमाणे लक्ष्य भेद केला. तत्पूर्वी २९ एप्रिल रोजी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याचे ठरले. या नावाने संबंध देशाला प्रेरणा मिळाली. यामुळेच ऑपरेशन सिंदूर का थांबवले? असा प्रश्न अनेकांनी विचारला. पण त्याचे समर्पक उत्तर आधीच देण्यात आलेले आहे.
सीमेवरील संघर्ष म्हणजे बुद्धिबळाचा पट
“ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही बुद्धिबळाच्या पटावर खेळल्या जातात तशा चाली खेळत होतो. शत्रूची पुढची चाल काय असेल आणि त्यावर मात कशी करायची? हे त्या त्या वेळी ठरवले जायचे. शत्रूही त्या प्रमाणेच आपल्या चाली खेळत होता. कधी आम्ही त्यांना मात देत होतो तर कधी आम्ही आमच्या जीवावर खेळून शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करत होतो. हेच तर जीवन आहे”, असेही मत उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानची सहा विमाने नष्ट
तत्पूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडले अशी माहिती हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी शनिवारी दिली. भारताने जमिनीवरून हवेत केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मारा असल्याचेही हवाई दलप्रमुखांनी स्पष्ट केले. या मोहिमेदरम्यान, भारताने अलीकडेच खरेदी केलेली ‘एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणा’ निर्णायक ठरल्याचेही त्यांनी सांगितले.