काश्मीर खोरे अद्यापही धुमसत असल्याने लष्कराने मंगळवारी पद्धतशीरपणे आपले सैनिक काश्मीरच्या दक्षिण भागांत तैनात केले. खोऱ्याला दहशतवादी आणि निदर्शकांपासून मुक्त करण्यासाठी लष्कराने शांतता मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून हे लष्कर तैनात करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवादी हल्ले करीत असून त्यांच्या समर्थकांकडून निदर्शने आणि वाहतूक रोखण्याचे प्रकार सुरू असल्याने या परिसरात जंगल राज पसरल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी जवळपास चार हजार अतिरिक्त सैनिक तेथे तैनात करण्यात आले आहेत. मात्र बळाचा किमान वापर करण्याच्या सक्त सूचना सैनिकांना देण्यात आल्या आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

राखीव ताफ्यामधील हे सैनिक पुलवामा, शोपियन, अनंतनाग आणि कुलगाम या चार जिल्ह्य़ात तैनात करण्यात आले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बरहान वानी याला ठार मारण्यात आल्यानंतर या जिल्ह्य़ातच मोठय़ा प्रमाणावर क्षोभ उसळला.

लष्कराला केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलीस मदत करीत असून ते संयुक्तपणे परिसर पिंजून काढत आहेत. रस्त्यावर पडलेली झाडे, विजेचे खांब, मोठे दगड, जळलेली वाहने बाजूला करून जनतेसाठी रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. पुलवामातील करिमाबाद परिसर मोकळा करण्यात आल्यानंतर आता सैनिकांनी आपला मोर्चा शोपियन आणि कुलगामकडे वळविला आहे. ईदनिमित्त ही प्रक्रिया थंडावली असली तरी लवकरच ती सुरू होणार आहे. आणखीही सैनिक परिसरात तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काश्मिरी युवक मोठय़ा प्रमाणावर दगड, पेट्रोल बॉम्ब घेऊन सज्ज असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला, जनतेला श्रीनगरकडे जाण्यापासून परावृत्त केले जात आहे. काश्मीरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून दक्षिणेकडील भागांत किमान १०० दहशतवादी घुसल्याचे वृत्त आहे.

संबूरा, लीलाहर, पुलवामा शहर, त्राल आणि काकपोरा, कैमूह आणि रेधवनी येथे हे संशयित लपून बसले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शोपियन जिल्ह्य़ातील कमला जंगलात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही वृत्त आहे. मात्र तेथे छापे टाकण्यात आले असता हाती काहीही लागले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army peace campaign in south kashmir
First published on: 14-09-2016 at 02:08 IST