मच्छिल येथे खोटय़ा चकमकीच्या प्रकरणात लष्कराने बुधवारी दोन अधिकाऱ्यांसह सहा जणांचे कोर्टमार्शल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोर्टमार्शलची प्रक्रिया सुरूही करण्यात येत आहे. या बनावट चकमकीत बारामुल्ला जिल्ह्य़ातील तीन मुस्लीम तरुणांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर दोन महिने काश्मीरमध्ये आंदोलन झाले व त्यात १२३ जण ठार झाले होते.
सूत्रांनी सांगितले, की खोटी चकमक केल्याप्रकरणी कोर्टमार्शल करण्याचे आदेश देण्यात आले असून ४ रजपूत रेजिमेंटचे कमांडर कर्नल डी.के.पठानिया, मेजर उपिंदर व इतर चार जणांचा समावेश आहे.
३० एप्रिल २०१० रोजी मच्छिल क्षेत्रात तीन घुसखोरांना प्रत्यक्ष ताबा रेषेवर ठार केल्याचा दावा लष्कराने केला व नंतर ते पाकिस्तानी अतिरेकी असल्याचाही दावा करण्यात आला.
तथापि, नंतर या चकमकीत मरण पावलेल्यांची नावे शहजाद अहमद, महंमद शफी, रियाझ अहमद अशी असून ते बारामुल्ला जिल्ह्य़ातील नदीहालचे रहिवासी होते. नातेवाइकांनी तक्रार दिल्यानंतर एक लष्करी जवान व इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती.त्यानंतर खोऱ्यात त्यामुळे आंदोलन पेटले होते.
उत्तर कमांडच्या अधिकृत प्रवक्तयाने सांगितले, की २०१० मध्ये मच्छिल चकमकीत सामील असलेले जवान व अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
साक्षीदारांची मदत घेऊन सर्वसमावेशक चौकशी पोलिस व न्याय विभागाच्या मदतीने करण्यात आली व पुरावेही सादर करण्यात आले, असे सांगून प्रवक्ता म्हणाला, की  संबंधितांनी केलेल्या गैरकृत्याच्या घटनेची सविस्तर छाननी केल्यानंतरच कोर्टमार्शल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोर्टमार्शल करून लष्कराकडून संबंधितांना न्याय दिला जाईल, असेही प्रवक्ता म्हणाला.