Svarn Singh Operation Sindoor: भारतीय सैन्यदलाने दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. तीन दिवसांच्या या मोहिमेत जम्मू-काश्मीरपासून राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या सीमेवर भारतीय सैनिक पहारा देण्यासाठी तैनात होते. याकाळात फिरोजपूरच्या सीमेवर १० वर्षांच्या स्वर्ण सिंग या मुलाने सैनिकांची सेवा केली. सैनिकांना दूध, लस्सी, चहा आणि बर्फ पुरविला. त्याच्या या योगदानाची दखल घेत आता भारतीय सैन्यदलाच्या पश्चिम विभागाने त्याचा सन्मान केला आहे.

भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने स्वर्ण सिंगचा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. फिरोजपूर कॅन्टोन्मेंटमध्ये झालेल्या एका समारंभात पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी स्वर्ण सिंगचा सत्कार केला. यावेळी त्यांनी पंजाबचे लोक आणि भारतीय सैन्यदल यांच्या नात्यावर प्रकाश टाकला. तसेच पंजाबच्या पुढच्या पिढ्यातही सैन्यदलाबाबत आत्मीयता असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पंजाबच्या भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या तारा वाली गावात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र तरीही स्वर्ण सिंगने न डगमगता सैनिकांना सेवा दिली आणि धैर्य व राष्ट्रभक्तीचे एक उदाहरण प्रस्थापित केले. तारा वाली गावातील शेतकरी सोना सिंग यांचा मुलगा असलेला स्वर्ण हा इयत्ता चौथीत शिकत आहे. सोना सिंग यांच्या शेतात तैनात असलेल्या सैनिकांची स्वर्ण सिंगने आस्थेवाईकपणे सेवा केली.

२२ एप्रिल रोजी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ जण मारले गेले. त्यानंतर ७ मे रोजी भारतीय सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मे महिन्यातील कडक उन्हात तीन दिवस हा लष्करी संघर्ष सुरू होता. यावेळी स्वर्ण सिंग सैनिकांसाठी दररोज पाणी, दूध, लस्सी, चहा आणि बर्फ घेऊन शेतात जात होता. यामुळे सैनिकांना मोठा दिलासा मिळाला.

स्वर्ण सिंगच्या या कामगिरीची दखल लगेचच लष्कराने घेतली. २५ मे रोजी ७व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल रणजित सिंग मनरल यांनी एका समारंभात स्वर्ण सिंगला सर्वात तरुण नागरी योद्धा संबोधत गौरविले. यावेळी त्याला स्मृतिचिन्ह आणि त्याच्या आवडीचा खाऊ देण्यात आला.

मोठा झाल्यावर सैन्यदलात जाणार

स्वर्ण सिंगने या समारंभात म्हटले होते, मला सैनिकांची सेवा करताना अजिबात भीती वाटली नव्हती. मलाही मोठा झाल्यावर सैनिक व्हायचे आहे. सैनिकांनी मला खूप प्रेम दिले. स्वर्णचे वडील सोना सिंग आणि आई रोषणी राणी यांना आपल्या मुलाच्या कर्तुत्वाचा आनंद वाटतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लष्कराने यानिमित्त दिलेल्या निवेदनात म्हटले की, स्वर्णची कहाणी देशातील अनेकांना प्रेरणा देणारी आहे. त्याने सैनिकांची केलेली सेवा महत्त्वाची आहे. भारतीय सैन्यदलाचा गोल्डन ॲरो विभाग स्वर्णचा सर्व शैक्षणिक खर्च उचलेल. स्वर्णला भविष्यातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी सैन्यदल सर्वतोपरी मदत करेल.