इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने (ICC) युक्रेनच्या युद्ध अपराधांसंबंधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट लागू केला आहे. युक्रेनमध्ये होणाऱ्या युद्ध आणि इतर अपराधांसाठी व्लादिमिर पुतीन यांना जबाबदार धरलं आहे. मॉस्कोने या संदर्भातल्या आरोपांचं वारंवार खंडन केलं आहे. रशियाच्या सैन्य दलांनी युक्रेनवर हल्ला करताना कुठलाही अत्याचार केलेला नाही. मात्र आयसीसीने आज पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातली बातमी दिली आहे.

मागच्या वर्षी युक्रेनवर रशियाने हल्ला केला. त्यानंतर हे हल्ले सुरूच आहेत. पुतिन यांनी जेव्हा युक्रेनवर हल्ला केला तेव्हा सगळ्या जगाला हेच वाटलं होतं की रशियापुढे युक्रेन गुडघे टेकणार. मात्र तसं झालं नाही. युक्रेनने रशियाच्या हल्ल्यांना उत्तर देणं सुरू ठेवलं आणि नेटाने लढाई सुरू ठेवली. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भूमिकेवरच प्रश्न निर्माण होत आहेत.

जागतिक घडामोडींचा अभ्यास करणारे अनेक तज्ज्ञ हे रशिया विखुरला जाईल आणि व्लादिमिर पुतिन यांचं अधःपतन होईल अशी शक्यताही वर्तवत आहेत. रशियाचे माजी सरकारी अधिकारी बोरिस बोन्डारेव्ह यांनी हे म्हटलं आहे की पुतिन हे जर युद्ध जिंकण्यात यशस्वी झाले नाही तर त्यांना त्यांचं राष्ट्राध्यक्षपद सोडावं लागण्याचीही शक्यता आहे. त्यासाठी त्यांना भरीस पाडलं जाईल. बोन्डारेव्ह यांनी मागच्या वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर आपलं पद सोडलं होतं. पुतिन हे काही सुपरहिरो नाहीत. तसंच त्यांच्याकडे कुठलीही सुपरपॉवर वगैरे काहीही नाही. पुतिन हे सर्वसाधारण हुकूमशाह आहेत. त्यांना रााष्ट्राध्यक्षपदावरून खाली खेचलंही जाऊ शकतं असंही मत त्यांनी व्यक्त केलं होतं.