केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भधारणा झाल्याप्रकरणी गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेल्या एका किशोरवयीन मुलाची डीएनए पितृत्व चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याला बिनशर्त जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.

३५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर शनिवारी या १८ वर्षीय युवकाची सुटका झाली. पोलिसांनी त्याला 22 जुलैच्या मध्यरात्री त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या तरुणाने पोलिसांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्याच्या वकिलांनी सांगितले की ते नुकसानीचा दावा दाखल करतील.

हेही वाचा – धक्कादायक! पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

“मी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि त्यातून तिला गर्भ राहिला, हा आरोप फेटाळला. त्यानंतर मला बेड्या घालून मुलीच्या घरी नेण्यात आलं. मुलीने पोलिसांना सांगितलं की मी तिच्याशी गैरवर्तन केलं आहे आणि गर्भधारणेसाठी जबाबदार आहे”, अशी प्रतिक्रिया या मुलाने दिल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. आपण मुलीला ओळखत असल्याचं त्याने मान्य केलं, मात्र तिच्याशी संबंध असल्याचं नाकारलं. “जेव्हा पोलिसांनी मला बलात्कार आणि मुलीच्या गर्भधारणेच्या आरोपाची कबुली देण्यास भाग पाडले, तेव्हा मी त्यांना सुटकेसाठी विनंती केली. गर्भधारणेची जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असंही या मुलाने सांगितलं.

या मुलाच्या वकिलांचं म्हणणं आहे की, केवळ मुलीच्या वक्तव्याच्या आधारे पोलिसांनी याच्याविरोधात कारवाई केली. “ कोणताही विलंब न करता पितृत्व चाचणीचा निर्णय विरोधी पक्षाच्या वकिलांचा होता. आम्ही पोलिसांविरोधात नुकसान भरपाई दाखल करण्याचा विचार करत आहोत”, असंही त्यांनी सांगितलं आहे.या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, पितृत्व चाचणीच्या निकालामुळे आमची चिंता मिटली. ही मुलगीदेखील आमच्या परिसरातली आहे, पण डीएनए चाचणीच्या निकालानंतरही त्यांनी माझ्या मुलाचा अपमान केल्याबद्दल माफी मागितली नाही.

दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, पितृत्व चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्याच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप असणारच आहेत. “ज्याच्यामुळे या मुलीला गर्भ राहिला आहे, त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आम्ही तपास सुरू केल्याचंही पोलिसांनी सांगितलं.