नवी दिल्ली : भाजपविरोधात लढण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नसून केवळ ‘आप’मध्ये आहे असा दावा ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला. इतकेच नाही तर गुजरातमध्ये काँग्रेस ही भाजपची ‘बी टीम’ आहे अशी टीकाही त्यांनी केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सोमवारी केजरीवाल यांनी चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यसभेचे सदस्य होऊन राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता फेटाळली.
केजरीवाल यावेळी म्हणाले की, ‘‘मी राज्यसभेवर जाणार नाही. पक्षातून अन्य कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्षाचे पॉलिटब्युरोचे सदस्य ठरवतील,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीपैकी तीन मतदारसंघांमध्ये ‘आप’ने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी २ जागा त्यांनी मोठय़ा मताधिक्याने जिंकल्या. या विजयामुळे ‘आप’ आणि केजरीवाल पुन्हा राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होतील असे मानले जात आहे.
गुजरातमध्ये सत्ता भाजपची असून प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे. तरीही विसावदर मतदारसंघामध्ये ‘आप’ने भाजपचा पराभव केला. हे पाहिले तर गुजरातमधील लोक भाजपला किती कंटाळले आहेत हे स्पष्ट होते, असे केजरीवाल म्हणाले.
पंजाबमधील लुधियाना-पश्चिम मतदारसंघातून ‘आप’चे संजीव अरोरो विजयी झाल्याने राज्यसभेतील एक जागा रिक्त होत आहे. या जागेसाठी ‘आप’कडून अरविंद केजरीवाल यांना उमेदवारी दिली जाईल असे मानले जात होते. मात्र, राज्यसभेचे सदस्य होण्याची शक्यता केजरीवाल यांनी फेटाळून लावली. त्यामुळे मनीष सिसोदिया वा अन्य कोणत्या नेत्याला उमेदवारी दिली जाईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल व सिसोदिया या दोघांचाही पराभव झाला होता.
या पोटनिवडणुकांवरून हे दिसते की काँग्रेसच्या नेतृत्वाने कशा प्रकारे ‘आप’चा पराभव करण्यासाठी भाजपला मदत केली. काँग्रेस भाजपची कठपुतळी झाली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे आणि ‘आप’मध्ये प्रवेश करावा अशी मी विनंती करतो. – अरविंद केजरीवाल, नेते, ‘आप’