दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून सत्तेत आलेल्या ‘आम आदमी पार्टी‘चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, असीम अहमद खान, संदीपकुमार, सत्येंद्र जैन, गोपाळ राय, जितेंद्रसिंह तोमर या मंत्र्यांनीही शपथ घेतली.  अरविंद केजरीवाल आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. केजरीवाल यांनी बरोबर एका वर्षापूर्वी याच दिवशी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दिल्ली विधानसभेत ‘आप’ने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे.
दिल्लीत ऐतिहासिक रामलीला मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी ‘आप‘चे हजारो समर्थक उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केजरीवाल यांनी हात उंचावून उपस्थित जनतेस अभिवादन केले. ‘आप’ समर्थकांची या वेळी वाढणारी गर्दी विचारात घेता सुरक्षा बंदोबस्तासाठी १,२०० पोलीस व अधिकाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता.  गेल्यावर्षी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर आपच्या नेत्यांकडून शिस्तीचे उल्लंघन करन करण्यात आले होते. त्यामुळे दिल्लीकरांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला होता. मात्र, यंदा आपच्या कार्यकर्त्यांकडून शिस्तीबद्धता पाळण्यात आल्याने शपथविधी सोहळा शांततेत पार पडला.