दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये एकमत झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी एक मोठं विधान केलं आहे. आप-काँग्रेस आघाडी झाल्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. आप-काँग्रेस आघाडीचा भाजपाने धसका घेतला आहे, असेही भारद्वाज म्हणाले. आज दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन भारद्वाज यांनी भाजपावर टीकास्र सोडले. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने दिल्लीमध्ये एकत्र निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सात जागांपैकी चार ठिकाणी ‘आप’ पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर तीन मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार उभे केले जातील.

आमच्या आघाडीचा भाजपाने धसका घेतला

‘आप’ आणि काँग्रेसने आघाडी करण्यासाठी बैठक घेतल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या पसरविण्यास सुरुवात झाली की, आमची आघाडी होणारच नाही. पण आम्ही आघाडीवर एकमत करू, याबद्दल भाजपा आणि माध्यमांनाही कल्पना नव्हती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्लीमध्ये आमची आघाडी होणार नाही, याबाबत विधान केलं होतं. मात्र ज्या क्षणी आम्ही आघाडी करण्याची घोषणा करत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला, त्याचक्षणी अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सातवे समन्स मिळाले असल्याची बातमी समोर आली. आम्हाला अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, आता फक्त ईडीच नाही तर सीबीआयदेखील अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी पुढे येणार आहे”, असे विधान भारद्वाज यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “१९९९ साली…”

सौरभ भारद्वाज पुढे म्हणाले की, फौजदारी प्रक्रिया संहिता कायद्याच्या कलम ४१ अ नुसार अरविंद केजरीवाल यांना नोटीस काढली जाईल. ती नोटीस केजरीवाल यांना दिल्यानंतर पुढच्या दोन-तीन दिवसांत अटक केली जाण्याची शक्यता आहे.

केजरीवाल यांना अटक केली तरी आघाडी अभेद्य राहील

भारद्वाज पुढे म्हणाले की, आप आणि काँग्रेसची आघाडी होणारच नाही, या गैरसमजुतीमध्ये भाजपाचे नेते होते. मात्र आघाडी झाल्यानंतर त्यांनी याचा धसका घेतला आहे. जर आप आणि काँग्रेस एकत्र आले तर त्यांना दिल्लीतील लोकसभा मतदारसंघात विजय मिळवणे कठीण जाईल, याची त्यांना कल्पना आहे. तुम्ही अरविंद केजरीवाल यांना अटक केली तरी आप आणि काँग्रेसची आघाडी कायम राहिल, असेही आव्हान भारद्वाज यांनी दिले.

‘आप’च्या वरिष्ठ नेत्या अतिशी म्हणाल्या की, तुम्हाला जितक्या नोटीसा पाठवायच्या आहेत, तेवढ्या पाठवा. जितके समन्स द्यायचे आहेत, तितके द्या. प्रत्येक ‘आप’ नेत्याला अटक करा. आम्हाला फासावर लटकवा. तरीही आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही यापूढेही लढत राहू, असा निर्धार अतिशी यांनी व्यक्त केला.