लोकसभा निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. निवडणुका कधी होणार याची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशात AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी थेट राहुल गांधींना खुलं आव्हान दिलं आहे. लोकसभा निवडणूक लढण्याविषयी हे आव्हान देण्यात आलं आहे. ओवैसींच्या या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

काय म्हटलं आहे ओवैसी यांनी?

“मी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आव्हान देतो. वायनाड नाही हैदराबादमधून निवडणूक लढून दाखवा. मोठमोठ्या घोषणा देता, आरोप करता, मग आता माझं आव्हान आहे. मैदानात या आणि माझ्या विरोधात लढून दाखवला. काँग्रेसचे लोक काहीही म्हणू देत. मी तयार आहे.” असं म्हणत राहुल गांधी यांना ओवैसी यांनी आव्हानच दिलं आहे. हैदराबाद या ठिकाणी ओवैसींची सभा पार पडली. त्या सभेत ओवैसी यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच उत्तर प्रदेशात जो वादग्रस्त ढाँचा होता तो सगळ्यात जुन्या पक्षाच्या सत्तेच्या काळात उद्ध्वस्त करण्यात आला असाही आरोप ओवैसींनी केला.

तेलंगणमध्ये विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी पार पडणार आहेत. तसंच लोकसभा निवडणूकही पुढच्याच वर्षी पार पडणार आहे. अशात एमआयएम आणि काँग्रेस आमनसामने आले आहेत. राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष असो की ओवैसींचा AIMIM पक्ष दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपा आणि एआयएमआयएम हे दोन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत असा आरोप राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत केला होता. त्यानंतर आता ओवैसींनी राहुल गांधींना ओपन चॅलेंज दिलं आहे.

Story img Loader