Asaduddin Owaisi on Operation Sindoor Discussion: आगामी आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानशी क्रिकेट सामना होणार आहे. मात्र, पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर या सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याचेच पडसाद सोमवारी लोकसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं. एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यावरून परखड शब्दांत सरकारला जाब विचारला. पाकिस्तानशी सगळे व्यवहार व सहकार्य करार बंद असताना आपण पाकिस्तानशी क्रिकेट कसं खेळू शकतो? असा सवाल ओवैसींनी उपस्थित केला आहे.

लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा चालू असून या विषयासाठी १६ तास देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी या मुद्द्यावर वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी आपापली भूमिका मांडली. या मुद्द्यावर बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारच्या धोरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यात पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळण्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा करेपर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

आपल्या भाषणात ओवैसींनी पाकिस्तानशी क्रिकेट सामन्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. “पंतप्रधानांनी सांगितलं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. तुम्ही पाकिस्तानशी व्यापार बंद केला, हवाई हद्द बंद केली, सागरी हद्द बंद केली. मग कुठल्या तोंडानं आपण पाकिस्तानशी क्रिकेट खेळत आहोत? माझा तरी विवेक मला ती मॅच बघण्याची परवानगी देणार नाही”, असं ओवैसी म्हणाले.

“या सरकारमध्ये इतकी हिंमत आहे का की पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना सांगाल की आम्ही ऑपरेशन सिंदूरद्वारे सूड घेतला, आता तुम्ही पाकिस्तानसोबतची मॅच बघा”, असंही ओवैसी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे चार उंदीर कुठून घुसले?”

दरम्यान, चोख सुरक्षा असूनही पहलगाममध्ये दहशतवादी कसे शिरले? याची जबाबदारी निश्चित करावी लागेल, असंही ओवैसी म्हणाले. “या सगळ्या प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी लागेल. साडेसात लाखांची फौज, केंद्रीय राखीव दले आहेत. मग कुठून हे चार उंदीर घुसले आणि आपल्या नागरिकांना मारलं? उपराज्यपाल, आयबी, पोलीस ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करा. पण तुम्हाला तर वाटतंय की ऑपरेशन सिंदूर केलं आणि आता लोक सगळं विसरून जातील”, अशा शब्दांत ओवैसींनी सरकारवर हल्लाबोल केला.