PM Modi’s praise for RSS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी १०३ मिनिटे भाषण करत राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय अशा विविध विषयांना हात घातला. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली. त्यांच्या या स्तुतीवरून आता असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधक टीका करत आहेत. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यलढ्याचा अवमान केल्याची आणि संघटनात्मक फायद्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाचे राजकारण केल्याचा आरोप केला जात आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यासह काँग्रेस, सीपीआय (एम) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संघाबद्दलच्या विधानाचा समाचार घेतला. संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या एनजीओने अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवशाली असे काम आजवर केले आहे.

पंतप्रधान नेमके काय म्हणाले?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मोदी म्हणाले, “१०० वर्षांपूर्वी एक संघटना जन्माला आली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांनी स्वतःला मातृभूमीसाठी समर्पित केले आहे. ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. सेवा, समर्पण, संघटना आणि अतुलनीय शिस्तीद्वारे, आरएसएसने राष्ट्र उभारणीत एक अद्वितीय भूमिका बजावली आहे. ती जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनांपैकी एक मानली जाते. लाल किल्ल्यावरुन मी सर्व स्वयंसेवकांना आणि त्यांच्या कार्याला सलाम करतो.”

असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींच्या स्तुतीसुमनावर बोलताना ओवैसी म्हणाले की, मोदींनी स्वातंत्र्यलढ्याचा अवमान केला आहे. संघ आणि त्यांच्या सहयोगींनी ब्रिटिशांचे हस्त म्हणून काम केले होते. त्यांनी ब्रिटिशांना विरोध करण्यापेक्षा गांधीजींचा अधिक द्वेष केला होता.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ओवैसी म्हणाले की, हिंदुत्वाची विचासरणी संविधानाच्या मूल्यांच्या विरुद्ध असून ती बहिष्कारावर विश्वास ठेवते. स्वयंसेवक म्हणून आरएसएसची स्तुती करण्यासाठी ते नागपूरला जाऊ शकले असते. पण पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून हे करण्याची काय गरज होती?

काँग्रेसचे खासदार आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनीही मोदींच्या विधानावर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणातील संघाच्या स्तुतीचा भाग सर्वाधिक क्लेशदायी होता. त्यांनी लाल किल्ल्यावरून केलेली स्तुती ही संवैधानिक, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक भावनेचे उघड उल्लंघन आहे. पुढील महिन्यात त्यांचा ७५ वा वाढदिवस येतो आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी संघटनेला खुश करण्याचा हा हताश प्रयत्न केलेला दिसतो.