अशोक गहलोत यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) लोकेश शर्मा यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अनेक आरोप केले. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्यात आलेल्या शर्मा यांनी आरोप केला आहे की गेहलोत यांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप दिल्या होत्या आणि त्यांना मीडियाला देण्यास सांगितले होते.

जयपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकेश शर्मा म्हणाले, “फोन टॅपिंग प्रकरणात दिल्लीतील गुन्हे शाखेने ८-९ तास अनेकवेळा सखोल चौकशी करूनही मी आतापर्यंत गप्प बसलो होतो. गेहलोत यांनी मला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि इतरांचे फोन रेकॉर्डिंग दिले.

“याआधी, मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला रेकॉर्डिंग मिळाल्याचे सांगितले होते, पण ते खरे नव्हते. अशोक गेहलोत यांनी मला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, काँग्रेस नेते भंवरलाल शर्मा आणि संजय जैन यांच्या ऑडिओ क्लिप पेन ड्राईव्हमधून दिल्या होत्या. प्रसारमाध्यमांत ते प्रसिद्ध करण्यास सांगितले होते”, असा आरोप लोकेश शर्मा यांनी आरोप केला.

सचिन पायलट यांचाही फोन टॅप करण्याचा प्रयत्न

अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील अडचणींबाबत ते काँग्रेस हायकमांडकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावर सचिन पायलट आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा त्यांनी पुढे केला .

“अशोक गेहलोत यांचे सरकार पाडण्याच्या प्रयत्नामागे भाजपचा हात होता, असे म्हणणे चुकीचे आहे. सचिन पायलट यांना प्रदेश नेतृत्वाविषयीच्या त्यांच्या भावना पक्षाच्या हायकमांडपर्यंत पोचवायच्या होत्या. जेव्हा ते आणि त्यांच्या जवळचे लोक हायकमांडला भेटायला जाण्याचा विचार करत होत तेव्हा त्यांचे फोन टॅपिंगवर ठेवले होते”, असं शर्मा यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेदरम्यान, शर्मा यांनी अशोक गेहलोत यांच्याशी झालेल्या संभाषणाचे कथित रेकॉर्डिंगही ऐकवले.

कथित रेकॉर्डिंगमध्ये, गेहलोत यांनी शर्मा यांना विचारले की ज्या फोनद्वारे रेकॉर्डिंग मीडियाला पाठवण्यात आले होते तो फोन नष्ट झाला आहे की नाही, आणि शर्मा यांनी अशोक गेहलोत यांचा उल्लेख केला की त्यांनी सोशल मीडियाद्वारे ऑडिओ रेकॉर्डिंग मिळाल्याचे मीडियाला सांगितले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशोक गहलोत स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा वापर करतात

“गेहलोत यांना वाटले की मी फोन नष्ट केला नाही. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्या कार्यालयावर एसओजीने छापा टाकला. हे आमच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सत्य आहे, ते लोकांचा त्यांच्या फायद्यासाठी कसा वापर करतात आणि नंतर त्यांना सोडून देतात. रेकॉर्डिंग कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर, माझा एकटाच सहभाग नव्हता, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ते रेकॉर्डिंग करून मला पेन ड्राईव्हमध्ये दिले. तसंच, सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री बनण्याच्या शक्यता नष्ट करण्याच्या प्रयत्नामागे अशोक गेहलोत यांचा हात असल्याचा दावा शर्मा यांनी केला.