रॉबर्ट वडरा यांचे जमीन खरेदी-विक्रीचे संशयास्पद व्यवहार उघडकीस आणल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले सनदी अधिकारी अशोक खेमका यांची हरयाणा सरकारने बुधवारी कमी महत्त्वाच्या पदावर बदली केली. चोवीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांची ही ४६वी बदली आहे. खेमका यांनी या बदलीचे वर्णन ‘वेदनादायक’ असे केले असून, मुख्यमंत्र्यांनी ही ‘नियमित बदली’ असल्याचे म्हटले आहे.
आतापर्यंत हरयाणा परिवहन विभागाचे आयुक्त व सचिव असलेले अशोक खेमका यांची भाजप सरकारने बुधवारी पुरातत्त्वशास्त्र व संग्रहालये विभागात बदली केली. परिवहन खात्यात अनेक मर्यादा आणि हितसंबंध असूनही या खात्यातील भ्रष्टाचाराची दखल घेऊन सुधारणा करण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला. तरीही झालेली बदली आपल्यासाठी ‘वेदनादायक’ असल्याची प्रतिक्रिया खेमका यांनी व्यक्त केली आहे.
‘जागल्या’ आयएएस अधिकारी मानले जाणारे १९९१ च्या तुकडीतील ४९ वर्षांचे खेमका यांची नियुक्ती १९९३ साली भूमी व महसूल खात्यात करण्यात आली व ती ११ महिने टिकली. त्यानंतर त्यांना अल्प काळासाठी कृषी व सहकार खात्यात हलवण्यात आले. प्रामाणिक व निर्भीड अधिकारी असलेल्या खेमका यांच्या एकूण २४ वर्षांच्या कार्यकाळात ४६ वेळा बदली करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मात्र खेमका यांची बदली हा प्रशासकीय मुद्दा असल्याचे सांगून या मुद्दय़ाला विशेष महत्त्व दिले नाही. खेमका हे ‘प्रामाणिक’ अधिकारी असून त्यांच्या बदलीकडे त्यांना दिलेली शिक्षा या दृष्टीने पाहिले जाऊ नये, अशी अपेक्षा खट्टर यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘खेमकांना महत्त्वाची जबाबदारी’
बंगळुरू : भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी अशोक खेमका यांच्या बदलीवरून अडचणीत सापडलेल्या भाजपने ही बदली चांगल्या कारणासाठी होती असा युक्तिवाद केला आहे. त्यांची बदली चांगल्या ठिकाणी केल्याचे समर्थन भाजप प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केले आहे. ही सेवा मोठी, ती लहान असे तुम्हाला नोकरीत असताना सांगता येणार नाही असा सल्ला हुसेन यांनी खेमका यांना दिला आहे. आमच्या सरकारने त्यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी दिल्याचे समर्थन शाहनवाझ यांनी केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok khemka among 9 ias officers transferred in haryana
First published on: 03-04-2015 at 01:50 IST