Ashoka University Professor Arrested: भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर ७ मे रोजी परराष्ट्र मंत्रालय आणि सुरक्षा दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सदर ऑपरेशनची माहिती दिली होती. या पत्रकार परिषदेवर हरियाणाच्या अशोका विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख अली खान महमुदाबाद यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप हरियाणा राज्य महिला आयोगाने केला आहे. भारतीय सशस्त्र दलातील महिला अधिकाऱ्यांचा अपमान आणि सांप्रदायिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत महिला आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आता हरियाणा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

राय (सोनीपत) येथील सहाय्यक पोलीस आयुक्त अजित सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की, प्राध्यापक महमुदाबादला आज दिल्लीत अटक करण्यात आली. त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल केले आहेत, याची माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा नेत्याच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

७ मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर अली खान महमुदाबाद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावून आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले.

महमुदाबाद यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग पुढे आल्याबद्दल महमुदाबाद यांनी समाधान व्यक्त करत हे चांगले चित्र असल्याचे म्हटले. पण वास्तवात मात्र हे चित्र दिसत नाही, त्यामुळे महिलांना पुढे करणे हे सरकारचे केवळ एक ढोंग असल्याचे ते म्हणाले होते. तसेच पहलगाम हल्ल्यानंतर तिथल्या एका स्थानिकाला अटक करण्यात आली होती. अतिरेकी गोळ्या झाडत असताना तो ‘अल्लाहू अकबर’ म्हटल्यामुळे संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेवरही महमुदाबाद यांनी पोस्ट टाकली होती.

प्राध्यापक अली खान महमुदाबाद यांनी केलेल्या पोस्टनंतर सोशल मीडियावरही अनेक उलट सुलट चर्चा झाल्या. अनेकांनी त्यांचा विरोध दर्शविला. त्यानंतर हरियाणा महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणात लक्ष घालून नोटीस बजावली. महमुदाबाद यांचे विधान राष्ट्राच्या लष्करी कारवाईला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे आयोगाने म्हटले.

१४ मे रोजी महमुदाबाद यांनी माध्यमांना निवदेन देऊन मला आयोगाचे आरोप फेटाळले होते. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला असून गैरसमज पसरविले जात आहेत. तसेच महिला आयोगाला माझ्यावर कारवाई करण्याचे अधिकारच नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

माझ्या पोस्टमध्ये मी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांची पत्रकार परिषदेसाठी निवड केल्याबद्दल मी कौतुक केले आहे. त्यामुळे माझी पोस्ट महिलांच्या हक्कांच्या आणि कायद्याच्या विरोधात कशी आहे? हे सिद्ध करण्यात महिला आयोग अपयशी ठरल्याचा दावा प्राध्यापक महमुदाबाद यांनी केला होता.

तसेच गळचेपी करणे आणि मुद्दामहून छळण्याचा हा नवा प्रकार सुरू झाल्याचेही ते म्हणाले. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माझे मुलभूत आणि संवैधानिक आणि वैधानिक अधिकार माहीत असून त्यावर माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे अशोका विद्यापीठाने मात्र प्राध्यापक महमुदाबाद यांच्या विधानापासून अंतर राखले आहे. “एका प्राध्यापकाने त्याच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर टाकलेली पोस्ट हे विद्यापीठाचे मत नाही. सदर विधान त्यांचे वैयक्तिक विधान आहे”, असे निवेदन विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.