ASI suicide case FIR filed against late IPS puran kumars wife and 3 others report : हरयाणा पोलीस अधिकारी संदीप कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी रोहतक सदर पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या एफआयआरमध्ये चार लोकांची नावे आहेत. आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांचे गनमॅन सुशील, कुमार यांच्या पत्नी पी अवनीत कौर भटिंडा ग्रामीणचे आमदार अमित रत्ना आणि आणखी एका व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, तपास सुरू असल्याचे कारण देत, अधिकाऱ्यांनी या एफआयआरची प्रत देण्यास नकार दिला आहे. मात्र हा एफआयआर दाखल झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात नेमकं काय सत्य बाहेर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप आरोपींवरील विशिष्ट आरोपांबद्दल माहिती दिलेली नाही आणि या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. त्यामुळे तपास होईल तसे या प्रकरणात अधिक माहिती समोर येणे अपेक्षित आहे.

काही दिवसांच्या फरकाने दोन वरिष्ठ हरियाणा पोलिस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याने आणि राज्याच्या पोलीस विभागात झालेले जातिभेद, भ्रष्टाचार आणि खंडणीचे आरोप यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. तसेच पोलीस-गँगस्टर यांच्यातील संबंधांचे वत्त समोर आल्याने पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येने या प्रकरणाला सुरूवात झाली. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळ आणि जातीय भेदभावाचे आरोप केले होते.

या घटनेनंतर, १४ ऑक्टोबर रोजी एएसआय संदीप कुमार यांनी कथितरित्या स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. संदीप कुमार हे वाय. पूरन कुमार यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी आणि व्हिडिओ मॅसेज मागे ठेवला, ज्यात त्यांनी कुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर लाचखोरी, खंडणीआणि महिला अधिकाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. या दोन आत्महत्येमुळे हरयाणा पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.