Asim Munir to get more powerful as Pakistan plans 27th amendment in constitution : पाकिस्तानचे आर्मी चीफ फील्ड मार्शल असीम मुनीर यांचा देशात आणि परदेशात प्रभाव वाढत आहे. यादरम्यान पाकिस्तान आपल्या संविधानात सुधारणा करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे त्यांच्या लष्कराला अधिक अधिकार मिळण्याची शक्यता आहे. शेहबाज शरीफ सरकारने याची पुष्टी केली आहे की ते लवकरच संसदेत २७वी घटनादुरुस्ती विधेयक सादर करतील, ज्यात सशस्त्र दलांच्या नेतृत्वाशी संबंधित प्रस्तावित बदलांचा समावेश आहे.
दरम्यान यामुळे मुनीर यांची पाकिस्तानवरील पकड आणखी घट्ट होईल असे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान पाकिस्तानात नागरिक आणि सैन्य यांच्यातील संबंध कायम संघर्षपूर्ण राहिले आहेत. लष्कराने यापूर्वी देशात शासन चालवलेले आहे, त्यांचा नागरी सरकारांवर मोठा प्रभाव राहिला आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा तसेच अर्थव्यवस्थेमध्ये लष्कराची मोठी भूमिका आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टनंतर संविधानातील बदलांबद्दल चर्चा सुरू झाली, या पोस्टमध्ये त्यांनी २७ व्या घटनादुरुस्तीसाठी सरकारने त्यांच्याकडे पाठिंबा मागितला असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमध्ये बोलताना या वृत्ताची पुष्टी केली आहे.
“नक्कीच, सरकार ते घेऊन येत आहे आणि ते आणले जाईल… २७ वी घटनादुरुस्ती होईल… आणि ती लवकरच होणार आहे. आम्ही हे विधेयक तत्त्वे, कायदे आणि संविधानाच्या मान्यतेने सादर करण्याचा प्रयत्न करू,” असे त्यांनी सांगितले.
सरकार योग्य प्रक्रिया पूर्ण न करता संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करत असल्याबाबात पाकिस्तानातील विरोध पक्ष तेहरीक-इन्साफ पक्षाने व्यक्त केलेल्या चिंता दार यांनी फेटाळून लावल्या आहेत.
“असे नाही की घटनादुरुस्ती विधेयक सादर केले जाईल आणि त्यावर बेशिस्तपणे, तात्पुरत्या पद्धतीने मतदान होईल, हे घडणार नाही,” असे आश्वासन दार यांनी यावेळी दिले.
कोणत्या सुधारणा प्रस्तावित आहेत?
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २७व्या घटना दुरूस्तीनुसार प्रस्तावित बदलांमध्ये संविधानाच्या कलम २४३ मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या कलमानुसार आर्मी चीफच्या आणि आर्म्ड फोर्सेसच्या कमांडची नियुक्ती केली जाते.
तसेच या प्रस्तावात संवैधानिक न्यायालयांची स्थापना, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरळीत करणे, तसेच एक्झिक्युटीव्ह मॅजिस्ट्रेट्स यांनी पुन्हा स्थापना करणे आणि न्यायाधीशांच्या बदल्यांची प्रकरणे यांचा समावेश आहे.
तसेच यामध्ये फेडरल रिसोर्सेसमध्ये प्रांचाचा वाटा कमी करणे आणि शिक्षण आणि पॉप्युलेशन वेल्फेअर मंत्रालयाचे नियंत्रण प्रांतीय सरकारांकडून फेडरल सरकारकडे वळवणे आणि नॅशनल फायनान्स कमिशन अंतर्गत प्रांतांच्या वाट्याला मिळणारे संरक्षण संपवणे याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे.
असीम मुनीर यांचे वाढते बळ
चीफ ऑफ आर्मी स्टाफ असीम मुनीर यांना मे महिन्यात झालेल्या भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर फील्ड मार्शल बनवण्यात आले आहे. तेव्हापासून पाकिस्तानच्या राजकारणात स्वतःचे स्थान आणखी मजूत करण्यासाठी मुनीर प्रयत्न करत आहेत. यादरम्यान ते अनेक परदेशी गेलेल्या शिष्टमंडळांचा भाग राहिले आहेत. इतकेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील पाकिस्तानबरोबरच्या वाटाघाटीत त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.
