लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने ५ एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसकडून जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, या जाहीरनाम्यावर आता भाजपाकडून टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा हल्लाबोल केला होता. यानंतर आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना खोचक टोला लगावला आहे.

हिमंता बिस्वा सरमा काय म्हणाले?

“काँग्रेस द्वेषाचे राजकारण करत असून आम्ही त्याचा निषेध करतो. काँग्रेसचा जाहीरनामा हा भारतातील नसून पाकिस्तानातील निवडणुकांसाठी असल्याचे दिसते. समाजात फूट पाडून सत्तेत येण्याची काँग्रेसची मानसिकता आहे. मात्र, आसाममधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपा जिंकेल”, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले. ते आसामच्या जोरहाटमध्ये माध्यमांशी बोलत होते. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

हेही वाचा : “राहुल गांधी राजकारणातले एमएस धोनी”, राजनाथ सिंह यांनी केली तुलना; म्हणाले, “मी कधी कधी विचार करतो…”

काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विधानाचा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते बेदब्रत बोरा म्हणाले, “हिमंता बिस्वा सरमा अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते. पण त्यांना पक्षाचे मुख्य विचार समजू शकले नाही. त्यामुळेच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आता ते काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

“लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचे दिसून येते. जाहीरनाम्याचा काही भागावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव दिसतो. आज जी काँग्रेस उरलेली आहे, त्या काँग्रेसकडे राष्ट्रहिताची काहीही ध्येयधोरणे नाहीत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.