Astronomer CEO Andy Byron resigns kiss cam scandal viral video : अमेरिकन टेक कंपनी अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायरन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बॉस्टनमधील कोल्डप्ले या बँडच्या कॉन्सर्टदरम्यान सहकारी क्रिस्टीन कॅबोट बरोबरचा बायरन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर कंपनीने त्यांना रजेवर पाठवले होते. आता त्यांनी राजीनामा दिल्याची बाब जाहीर करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क येथील टेक कंपनीने निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये बायरन यांनी राजीनामा दिल्याचे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने तो स्वीकारल्याचे म्हटले आहे. दरम्यान कंपनीने कालच सीइओ बायरन यांना रजेवर पाठवण्यात आल्याचे आणि संचालक मंडळाने व्हायरल घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती दिली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी बायरन यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे.
प्रकरण काय आहे?
मॅसॅच्युसेट्समधील फॉक्सबरो येथील जिलेट स्टेडिएमवर आयोजित कोल्डप्लेच्या कॉन्सर्टदरम्यान जेव्हा अचानक कॅमेरा गर्दीवर फिरवण्यात आला आणि तो बायरन आणि कॅबोट यांच्यावर स्थिरावला, तेव्हा हे जोडपे एकमेकांना मिठी मारताना दिसून आले. हा सगळा प्रकार स्टेडियमवर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. या जोडप्याकडे कॅमेरा जाताच ते खाली लपताना आणि एकमेकांपासून दूर पळताना दिसून आले. यावेळी कोल्डप्ले बँडचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन देखील म्हणाला की, “एकतर त्यांच्यात अफेअर सुरू आहे किंवा ते खूपच लाजाळू आहेत.” एकंदरीत या दोघांचे प्रेमसंबंध या कॉन्सर्टमध्ये अनावधानाने जगसमोर आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
NEW: CEO Andy Byron and HR head Kristin Cabot from Astronomer caught having an affair on the jumbotron at Coldplay’s Boston concert pic.twitter.com/QloKq6n5NO
— Unlimited L's (@unlimited_ls) July 17, 2025
शुक्रवारी कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थापनेपासून आपल्याला मार्गदर्शन करणारी मूल्य आणि संस्कृतीशी अस्ट्रॉनॉमर ही वतनबद्ध आहे, आपल्या नेतृत्वाकडून वर्तन आणि जबाबदारी याबाबत एक स्टँडर्ड निश्चित करणे अपेक्षित आहे, आणि नुकतेच हे स्टँडर्ड गाठता आले नाहीत. दरम्यान बायरनच्या राजीनाम्यानंतर अॅस्ट्रोनॉमर कंपनीने स्पष्ट केले की ते नवीन सीईओचा शोध सुरू करतील आणि तोपर्यंत, कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट डीजॉय कंपनीचे अंतरिम सीईओ म्हणून काम पाहतील.
कंपनीने बायरन यांच्या राजीनाम्याची घोषणा करताच त्यांचे लिक्डइन खाते हे सार्वजनिक ठेवण्यात आलेले नाही, इतकेच नाही तर ते लिडरशीप पेजवरून देखील हटवण्यात आले आहे. असे असले तरी बायरन हे कंपनीच्या वेबसाईटवर मात्र आहेत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार त्यांचा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सदस्य म्हणून कंपनीच्या वेबसाईटवर उल्लेख आहे.