CEO Pete DeJoy On Andy Byron And Kristin Cabot Video : गेल्या काही दिवसांपासून बॉस्टनमधील कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. ही चर्चा आहे एका ‘किस कॅम’ व्हिडीओची. या कॉन्सर्टमधील व्हायरल झालेला व्हिडीओ सॉफ्टवेअर कंपनी अ‍ॅस्ट्रोनॉमरचे माजी सीईओ अँडी बायर्न आणि एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट यांचा आहे. या कोल्डप्ले कॉन्सर्टमुळे अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबोट यांचं अफेअर उघडकीस आलं.

या व्हिडीओमध्ये हे दोघं एकमेकांना मिठी मारून रोमान्स करताना दिसून आले होते. मात्र, या १० सेकंदाच्या व्हायरल व्हिडीओनंतर एका अब्जाधीश कंपनीच्या सीईओंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अँडी बायरन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी अॅस्ट्रॉनॉमरचे अंतरिम सीईओ पीट डेजॉय यांनी पदभार स्वीकारला आहे. अॅस्ट्रॉनॉमरच्या सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पीट डेजॉय यांनी पहिल्यांदाच किस स्कँडलसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

डेजॉय यांनी या संदर्भात सोमवारी लिंक्डइनलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पीट डेजॉय यांनी म्हटलं की, “गेल्या काही दिवसांतील घटनांनी माध्यमांचं इतकं लक्ष वेधलं आहे की डेटा आणि एआय जगतातील छोट्या कोपऱ्यातील स्टार्टअप्स सोडाच फार कमी कंपन्यांना याचा सामना करावा लागतो.”

“आमच्या टीमसाठी स्पॉटलाइट असामान्य आणि अवास्तव राहिला आहे. मी कधीही असं घडावं अशी इच्छा केली नसली तरी, अॅस्ट्रॉनॉमर आता घराघरात पोहोचलेले नाव आहे”, असं पीट डेजॉय यांनी म्हटलं. दरम्यान, २०१७ मध्ये डेटा ऑपरेशन्स कंपनीची सह-स्थापना करणारे डेजॉय यांना शनिवारी अॅस्ट्रॉनॉमर कंपनीचं अंतरिम सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आलं.

सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आल्यानंतर पीट डेजॉय यांनी म्हटलं की, “मी अ‍ॅस्ट्रोनॉमरमध्ये अंतरिम सीईओच्या भूमिकेत पाऊल ठेवलं आहे. ही एक अशी कंपनी आहे, जिच्या उभारणीत मी माझं संपूर्ण व्यावसायिक आयुष्य अभिमानाने ओतलं आहे. अॅस्ट्रॉनॉमरमध्ये आम्ही कधीही आव्हानांपासून दूर गेलो नाही. या व्यवसायाच्या उभारणीत जवळजवळ दशकभर आमची वेळोवेळी परीक्षा घेतली आहे. प्रत्येक वेळी आम्ही अधिक मजबूत झालो आहोत. मी आमच्या लोकांची काळजी घेण्याच्या आणि आमच्या ग्राहकांसाठी सेवा देण्याच्या पूर्ण मनाने वचनबद्धतेने या भूमिकेत पाऊल टाकत आहे”, असं पीट डेजॉय यांनी म्हटलं.

नेमकं प्रकरण काय आहे?

मॅसॅच्युसेट्समधील फॉक्सबरो येथील जिलेट स्टेडिएमवर आयोजित कोल्डप्लेच्या कॉन्सर्टदरम्यान जेव्हा अचानक कॅमेरा गर्दीवर फिरवण्यात आला आणि तो बायरन आणि कॅबोट यांच्यावर स्थिरावला, तेव्हा हे जोडपे एकमेकांना मिठी मारताना दिसून आले होते. हा सगळा प्रकार स्टेडियमवर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. या जोडप्याकडे कॅमेरा जाताच ते खाली लपताना आणि एकमेकांपासून दूर पळताना दिसून आले. यावेळी कोल्डप्ले बँडचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन देखील म्हणाला की, “एकतर त्यांच्यात अफेअर सुरू आहे किंवा ते खूपच लाजाळू आहेत.” एकंदरीत या दोघांचे प्रेमसंबंध या कॉन्सर्टमध्ये अनावधानाने जगसमोर आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

त्यानंतर शुक्रवारी कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, स्थापनेपासून आपल्याला मार्गदर्शन करणारी मूल्य आणि संस्कृतीशी अस्ट्रॉनॉमर ही वतनबद्ध आहे, आपल्या नेतृत्वाकडून वर्तन आणि जबाबदारी याबाबत एक स्टँडर्ड निश्चित करणे अपेक्षित आहे, आणि नुकतेच हे स्टँडर्ड गाठता आले नाहीत. दरम्यान बायरनच्या राजीनाम्यानंतर अॅस्ट्रोनॉमर कंपनीने स्पष्ट केले की ते नवीन सीईओचा शोध सुरू करतील आणि तोपर्यंत, कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट डेजॉय कंपनीचे अंतरिम सीईओ म्हणून काम पाहतील.