आपल्या नजीकच्या दीर्घिकेत म्हणजे २२ दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावर कधी पाहिल्या नव्हत्या अशा हायड्रोजनच्या नद्या वाहात आहेत असे खगोलवैज्ञानिकांनी म्हटले आहे.
अतिशय अंधुक वेटोळ्यासारखा दिसणारा हा हायड्रोजनचा प्रवाह एनजीसी ६९४६ या दीर्घिकेत आहे व त्यामुळे सर्पिलाकार दीर्घिका या संथ गतीने ताऱ्यांची निर्मिती कशी करीत राहतात याचा उलगडा होऊ शकणार आहे.
वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठातील खगोलवैज्ञानिक डी. जे. पिसानो यांनी सांगितले की, ताऱ्यांचे इंधन हे दुसरीकडूनच तयार होऊन येत असते. आतापर्यंत अनेक दीर्घिकांमध्ये नेमके काय असते याच्या स्पष्टीकरणासाठी आवश्यक असलेली दहा टक्के माहिती आपल्याकडे आहे. हायड्रोजनच्या नद्या म्हणजे शीत प्रवाह हे आंतरदीर्घिकीय अवकाशातून ताऱ्यांच्या निर्मितीसाठी उपलब्ध करून देत असावेत पण हा हायड्रोजन इतका विरल असतो की तो शोधून काढणे अवघड असते.
एनजीसी ६९४६ या पृथ्वीपासून २२ दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या दीर्घिकेतील हायड्रोजन प्रवाह हे सिफेअस व हंस तारकासमूहाच्या सीमेवर आहेत. त्यामुळे ताऱ्यांच्या निर्मितीसाठी नेमके इंधन कुठून मिळते व तशाच सर्पिलाकार दीर्घिकांमधील ताऱ्यांनाही ते कोठून मिळते हा प्रश्न कायम आहे. एनजीसी ६९४६ या दीर्घिकेचा अभ्यास हा वेस्टरबोर्क सिंथेसिस रेडिओ दुर्बीणीने करण्यात आला असून ही दुर्बीण नेदरलँड्स येथे आहे.
यात हायड्रोजनच्या प्रवाहामुळे निर्माण झालेली प्रभावळ दिसत आहे, जो अनेक सर्पिलाकार दीर्घिकांचा गुणधर्म असतो, दीर्घिकेच्या चकतीसारख्या भागातून हायड्रोजन बाहेर टाकला जातो. तो ताऱ्यांची निर्मिती व अतिनवताऱ्यांच्या स्फोटामुळे बाहेर पडतो. आता जो हायड्रोजनचा शीत प्रवाह सापडला आहे त्याचा स्रोत मात्र वेगळा असून आंतरदीर्घिकीय अवकाशात असावा व दीíघकेतील ताऱ्यांची निर्मिती व अतिनवताऱ्यांची प्रक्रिया यातून जी प्रचंड उष्णता बाहेर पडते त्यातून हायड्रोजनचा हा प्रवाह तयार होत असावा. अमेरिकी विज्ञान महासंघाच्या रॉबर्ट सी बायर्ड ग्रीन बँक टेलिस्कोप (जीबीटी) या दुर्बीणीचा वापर करून पिसानो यांना एनजीसी ६९४६ या दीर्घिकेतून बाहेर पडणारा हायड्रोजनच्या प्रवाहाचे अस्तित्व सिद्ध करणारा प्रकाश दिसून आला.
खरेतर तो दुर्बीणीतूनही दिसणे दुरापास्त असते कारण त्यातून आलेला संदेश कमकुवत असतो. खगोलवैज्ञानिकांच्या मते मोठय़ा दीर्घिका या शीत हायड्रोजनमधून कायमस्वरूपी इंधन मिळत असते, इतर कमी वस्तुमानांच्या दीर्घिकांकडून ते येत असावे.
एनजीसी ६९४६ या दीर्घिकेत वेटोळ्यासारखे प्रवाह दिसले जे शीत प्रवाहांचा नेहमी भाग असतात. असेही शक्य आहे की, मागील काळात ही दीर्घिका शेजारच्या दीर्घिकेला घासून गेली असावी व त्यातून उदासीन हायड्रोजनअणूंची ही रिबनसारखी मालिका तयार झाली असावी. तथापि या वेटोळ्यांमध्ये लहान पण निरीक्षण करता येण्यासारखे तारे असतात. आणखी संशोधनात या निरीक्षणावर आणखी प्रकाश टाकता येईल. अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये याचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
हायड्रोजनच्या प्रवाहांचे मोठय़ा प्रमाणात अस्तित्व
आपल्या नजीकच्या दीर्घिकेत म्हणजे २२ दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावर कधी पाहिल्या नव्हत्या अशा हायड्रोजनच्या नद्या वाहात आहेत असे खगोलवैज्ञानिकांनी म्हटले आहे.
First published on: 29-01-2014 at 01:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astronomers discover river of hydrogen flowing through space