भारतीय जनता पक्ष 2019 निवडणुकीसाठी अटलबिहारी वाजपेयींच्या नावाचा वापर करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी अंत्ययात्रेत पाच किमी चालण्याऐवजी त्यांच्या आदर्शावर चालले तर देशाचं भलं होईल. आगामी निवडणुकांसाठी वाजपेयींचं नाव वापरलं जात आहे असा आरोप अटलबिहारी वाजपेयींच्या भाची करुणा शुक्ला यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासहित भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री पाच किमी पायी चालले होते. ज्या ट्रकमधून अटलबिहारी वाजपेयी यांचं पार्थिव नेलं जात होतं, त्याच ट्रकसोबत मोदी, अमित शाह चालत होते. करुणा शुक्ला यांनी यावरुनच ही टीका केली आहे.

नया रायपूरचं नामकरण अटल नगर करण्यावरुन त्यांनी म्हटलं की, ‘वाजपेयींच्या नावाचा वापर मतांसाठी नाही झाला पाहिजे’. करुणा शुक्ला यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्या सांगताना दिसत आहेत की, ‘चार राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, यामुळेच नरेंद्र मोदी, अमित शाह आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह वाजपेयींच्या नावाचा वापर करत आहेत’.

‘असं नामकरण करण्यापेक्षा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर ते चालले असते तर जास्त बरं झालं असतं. नरेंद्र मोदींनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरुन त्यांचं नाव घेतलं होतं. हे सर्व निवडणूक लक्षात ठेवूनच केलं जात आहे’, असंही त्या म्हणाल्या आहेत. करुणा शुक्ला माजी लोकसभा खासदार असून त्यांना 2014 मध्ये भाजपाने तिकीट देण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांनी राजीनामा सोपवला होता. सध्या त्या काँग्रेसमध्ये असून छत्तीसगडमध्ये पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘पक्षात लालकृष्ण आडवाणींचा होणारा अपमान पाहून मी दु:खी आहे. मला याचंही दु:ख आहे की गेल्या साडे चार वर्षांपासून देशाची सत्ता नरेंद्र मोदी आणि 15 वर्षांपासून छत्तीसगडची सत्ता रमन सिंह यांच्या हाती आहे. इतक्या वर्षात त्यांना कधीही वाजपेयींची आठवण झाली नाही. त्यांना भारतरत्न मिळाला होता. आधीही त्यांच्या नावे अनेक योजना होत्या. हे सर्व राजकीय खेळ आहेत. यामुळे मी दु:खी आहे’.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atal bihari vajpayees niece criticise narendra modi bjp politicinsg death
First published on: 24-08-2018 at 02:15 IST