माफिया आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ अहमद या दोघांची शनिवारी (१५ एप्रिल) रात्री हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथील कॉल्विन वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना तीन अज्ञातांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या दोघांचीही डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबार झाला तेव्हा अतिक आणि अशरफ दोघेही जागीच कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही, तीन मारेकऱ्यांनी अतिक आणि अशर्रफ यांच्यावर गोळीबार केला. या हत्येपूर्वी उमेश पाल अपहरण प्रकरणात कोर्टासमोर हजर झाल्यानंतर अशर्रफ बरेली तुरुंगात परतला होता. तेव्हा बरेलीत माध्यमांशी बोलताना तो म्हणाला होता की, “एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दोन आठवड्यांमध्ये मला मारण्याची धमकी दिली आहे.” अशर्रफचे हे शब्द आता खरे ठरले आहेत. त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर दोन आठवडे आणि पाच दिवसांनी त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

अशर्रफने बरेलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचित केली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, “एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मला धमकी दिली आहे की, कोणत्या ना कोणत्या बहाण्याने, एखादं कारण काढून एक-दोन आठवड्यांनंतर तुम्हाला (अतिक आणि अशर्रफ) तुरुंगातून बाहेर काढलं जाईल आणि तुम्हाला संपवलं जाईल. मी त्या अधिकाऱ्याचं नाव सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबाला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशर्रफ म्हणाला होता की, “माझ्या हत्येनंतर सीलबंद लिफाफा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचेल”. यावेळी माध्यमांशी बोलताना अशर्रफने विचारलं होतं, “मी तुम्हाला माफिया दिसतो का? मी गेली तीन वर्षे तुरुंगात आहे. मी एकदा आमदारसुद्धा झालो आहे. मी तुरुंगात बसून एखादा कट कसा काय रचू शकतो. मी तुरुगांत कोणालाही भेटलो तरी ती भेट एलआययूच्या देखरेखीखाली असते. “