नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेट ओलांडून प्रवेशद्वाराचा ताबा घेतल्याची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली असून हे पोलिसांचे अपयश असल्याचे ताशेरे ओढले आहेत. तेथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशी करून उत्तर द्यावे, तसेच संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, असे आदेशही न्यायालयाने सोमवारी दिले.

या प्रकरणी पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी भाजयुमोचे सुमारे २०० कार्यकर्ते गेले होते. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्या. नवीन चावला यांच्या खंडपीठाने सोमवारी या प्रकरणी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीच्या निवासस्थानी, मग ती मुख्यमंत्री असो की न्यायाधीश, मंत्री, असा प्रकार घडतो, हे अस्वस्थ करणारे आहे. तीन ठिकाणी लावलेले बॅरिकेट हटवून लोक तेथे कसे घुसू शकतात, तसे असेल तर पोलिसांची क्षमता आणि कार्यपद्धती यावरच गांभीर्याने विचार करावा लागेल.  

केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखालील विशेष तपासणी पथकाकडून चौकशी करावी, या मागणीसाठी आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी न्यायालयात याचिका केली आहे.