पीटीआय, इम्फाळ : वांशिक संघर्षांने होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये संशयित समाजकंटकांनी खामेनलोक भागातील एका खेडय़ावर केलेल्या हल्ल्यात किमान नऊ जण ठार, तर दहा जण जखमी झाले. सशस्त्र हल्लेखोरांनी इम्फाळ पूर्व आणि कांगपोकी जिल्ह्यांच्या सीमेवरील खामेनचोकमधील कुकी खेडय़ाला घेराव घातला आणि मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास हल्ला चढवला. या वेळी झालेल्या गोळीबारात दोन्ही बाजूंचे लोक मरण पावले व काही जखमी झाले.

हा भाग मैतेईबहुल इम्फाळ पूर्व जिल्हा आणि आदिवासीबहुल कांगपोकी जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी संचारबंदीची मुदत इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सकाळी पाच ते सायंकाळी सहा या नेहमीच्या वेळेएवजी कमी करून सकाळी पाच ते नऊ अशी केली आहे. मणिपूरच्या १६ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी अजूनही लागू असून, संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा स्थगित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत १०० हून अधिक बळी

मणिपूरमध्ये सुमारे महिनाभरापूर्वी मैतेई व कुकी समुदायांमध्ये उफाळलेल्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत शंभराहून अधिक लोक ठार, तर ३१० लोक जखमी झाले आहेत. राज्यात शांतता पुनस्र्थापित करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत.