नवी दिल्ली : ‘‘भारतात १९७५ च्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीची पायमल्ली करण्याचा प्रयत्न झाला होता. अखेर जनतेने लोकशाही मार्गाने  हुकूमशाही मानसिकतेचा पराभव केला, असे जगात दुसरे उदाहरण सापडणे कठीण आहे.  आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  साजरा करत असताना आणीबाणीचा अंधारलेला काळ विसरता कामा नये,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी  ‘मन की बात’ कार्यक्रमात केले.

देशात ४७ वर्षांपूर्वी २५ जूनला आणीबाणी लागू झाली होती. त्या काळाबाबत  मोदींनी सांगितले, की आणीबाणीत वैयक्तिक स्वातंत्र्यासह सर्व अधिकार काढून घेण्यात आले आणि न्यायव्यवस्था आणि माध्यमांसह सर्व संस्थांवर कठोर निर्बंध लादण्यात आले होते. २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असताना देशात आणीबाणी लागू केली गेली होती. २१ मार्च १९७७ रोजी ती उठवण्यात आली. काँग्रेसचे नाव न घेता मोदी म्हणाले, की आणीबाणीच्या काळात नागरिकांचे सर्वाधिकार काढून घेण्यात आले. या अधिकारांत राज्यघटनेच्या कलम २१ अनुसार हमी दिलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचाही समावेश होता. त्या वेळी भारतात लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाला. देशाची न्यायालये, सर्व वैधानिक संस्था, प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. ही ‘सेन्सॉरशिप’ इतकी कठोर होती की सरकारी मंजुरीशिवाय कोणतीही गोष्ट प्रकाशित करता येत नव्हती. प्रसिद्ध गायक किशोरकुमार यांनी या काळात सरकारच्या प्रशंसेस  नकार दिला, तर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.   हजारो जणांना अटक आणि लाखो लोकांवर अत्याचार होऊनही त्यांचा लोकशाहीवरील विश्वास कमी झाला नाही. आपल्यात रुजलेली मूल्ये, लोकशाहीच्या भावनेचा अखेर विजय झाला.

अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक!

अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचेही या वेळी मोदींनी कौतुक केले. ‘इन-स्पेस’चा संदर्भ देत मोदींनी सांगितले, की त्यामुळे अवकाश क्षेत्रातील खासगी कंपन्यांना संधी निर्माण होत आहेत. नवउद्योगांची (स्टार्ट अप) संख्या आता शंभरच्या पुढे गेली आहे. हे सर्व नवउद्योग खासगी क्षेत्रासाठी जे अशक्य मानले जात होते, अशा अकल्पित क्षेत्रांत उल्लेखनीय काम करत आहेत. ‘अग्निकुल’ आणि ‘स्कायरूट’सारख्या कंपन्या प्रक्षेपक विकसित करत आहेत. नवनवीन कल्पनांवर काम करणारे यापैकी अनेक विद्यार्थी लहान शहरांतील आहेत.