मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीबाबतच्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. अशातच भारतीय पुरातत्व विभागाने या प्रकरणातील एक पुरावा सादर केला आह. या वादग्रस्त जमिनीबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने (एएसआय) मोठा खुलासा केला आहे. पुरातत्व विभागाने म्हटलं आहे की, मुघल बादशाह औरंगजेबाने मथुरेतील कृष्ण जन्मभूमी मंदिर तोडून त्या जागेवर मशीद उभारली होती. एएसआयने १९२० मधील ऐतिहासिक पुरावे आणि दस्तावेजांच्या आधारावर ही माहिती सादर केली आहे. शाही ईदगाह मशीदप्रकरणी न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात पुरावा म्हणून एएसआयचा हा अहवाल महत्त्वाचा ठरू शकतो.
भारतीय पुरातत्व विभागाने नोव्हेंबर १९२० मध्ये या वादग्रस्त जागेचं सर्वेक्षण केलं होतं. उत्तर प्रदेशमधील मैनपुरी येथील रहिवासी अजय प्रताप सिंह यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत एएसआयचा तो जुना सर्वेक्षण अहवाल मागितला होता. त्यावर उत्तर देताना आग्र्यातील पुरातत्व विभागाने म्हटलं आहे की, संबंधित वादग्रस्त जागेवर कृष्णाचं मंदिर होतं. मुघल बादशाह औरंगजेबाने ते मंदिर तोडलं आणि त्या जागेवर शाही ईदगाह मशीद बांधली. अजय सिंह यांना आरटीआयअंतर्गत मिळालेली माहिती इकोनॉमिक टाईम्सने प्रसिद्ध केली आहे.
येथील कटरा माळावर मशीद बांधण्यात आली आहे. परंतु, पूर्वी याच जागी केशवदेवाचं मंदिर होतं. जे औरंगजेबाच्या आदेशानंतर पाडण्यात आलं होतं. त्यानंतर औरंगजेबाने तिथे मशीद बांधली. भारतीय पुरातत्व विभागाने १९२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणातील माहिती तारखांसह प्रदान केली आहे. पुरातत्व विभागाने कृष्ण जन्मभूमी मंदिराचा ३९ स्मारकांच्या यादीतही समावेश केला होता. या यादीत ३७ व्या नंबरवर या मंदिराचा उल्लेख आहे.
न्यायालयात चालू असलेला हा खटला १३.३७ एकर जमिनीशी संबंधित आहे. यापैकी १०.९ एकर जमीन ही श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर समितीकडे आहे. तर शाही ईदगाह मशीदीकडे अडीच एकर जमीन आहे. परंतु, हिंदू पक्षकारांनी संपूर्ण १३.३७ एकर जमिनीवर दावा केला आहे. संपूर्ण जमीन आपल्या ताब्यात यावी यासाठी मंदिर समितीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी चालू आहे.