नवी दिल्ली : भारताच्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर बुधवारी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रवाना झाले. भारताच्या राकेश शर्मा यांच्यानंतर ४१ वर्षांनी शुभांशू शुक्ला यांनी अवकाशात झेप घेतली. ‘माझ्या देशबंधूंनो, ४१ वर्षांनी आपण (भारत) अवकाशात पुन्हा पोहोचलो. हा प्रवास खूपच छान झाला.’ पृथ्वीपासून २०० किलोमीटर अंतरावरील कक्षेत ‘ड्रॅगन’ अवकाशकुपी नेल्यानंतर शुक्ला यांनी हे उद्गार काढले. तर मला या क्षणी काहीही म्हणायचे नाही. मी फार आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया शुभांशू यांच्या मातोश्री आशा शुक्ला यांनी दिली.

‘अॅक्सिऑम-४’ मोहिमेंतर्गत ‘स्पेस एक्स’चे ‘फाल्कन-९’ रॉकेट फ्लोरिडामधील केनेडी अवकाश केंद्रातून अंतराळवीरांना घेऊन भारतीय स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.०१ मिनिटांनी उडाले. या मोहिमेचे सारथ्य ग्रुप कॅप्टन शुक्ला करीत असून, मोहिमेचे नेतृत्व ‘नासा’च्या पेगी व्हाइट्सन करीत आहेत. अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जातील. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात २८ तासांचा प्रवास करून गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता अंतराळवीर पोहोचतील. अंतराळवीर अवकाश स्थानकात १४ दिवस राहतील आणि ६० प्रयोग करतील.

‘अॅक्सिऑम स्पेस’च्या व्यावसायिक मोहिमेंतर्गत हे उड्डाण होत आहे. उड्डाणानंतर १० मिनिटांनी अंतराळवीर पृथ्वीभोवती कक्षेत फिरायला लागले. कक्षेत स्थिर झाल्यानंतर अंतराळवीरांनी त्यांच्या अवकाशकुपीचे ‘ग्रेस’ नाव जाहीर केले. या वेळी शुक्ला यांनी अवकाशात ४१ वर्षांनी भारतीय पुन्हा पोहोचल्याची घोषणा केली. हा प्रवास १.४ अब्ज भारतीयांचा आहे, अशी प्रतिक्रिया ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी अवकाश प्रवासाला निघण्यापूर्वी दिली. अवकाश स्थानकावरील मुक्कामात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ग्रुप कॅप्टन शुक्ला संवाद साधण्याची शक्यता आहे. दरम्यान, तांत्रिक आणि हवामानाच्या कारणांमुळे यापूर्वी हे उड्डाण पुढे ढकलावे लागले होते.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पहिले भारतीय

‘अॅक्सिऑम-४’ मोहिमेत ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, ‘नासा’मधील अंतराळवीर आणि मोहिमेचे नेतृत्व सांभाळणाऱ्या पेगी व्हाइट्सन, पोलंडचे स्लावोझ उझ्नान्स्की आणि हंगेरीचे टिबर कापू हे अंतराळवीर आहेत. भारत १९८४ नंतर, पोलंड १९७८ नंतर आणि हंगेरी १९८० नंतर अवकाशात पुन्हा गेले आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे ग्रुप कॅप्टन शुक्ला हे पहिले भारतीय अंतराळवीर असतील. यापूर्वी राकेश शर्मा १९८४ मध्ये सोव्हिएत संघाच्या ‘सॅल्यट-७’ अवकाश केंद्रात होते.

भारत, पोलंड, हंगेरी, अमेरिकेच्या अंतराळवीरांना घेऊन निघालेल्या अवकाश मोहिमेची सुरुवात यशस्वी झाल्याचे आम्ही स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे ग्रुप कॅप्टन शुक्ला हे पहिले भारतीय असतील. १.४ अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा त्यांच्याबरोबर आहेत. त्यांना, इतर अंतराळवीरांना शुभेच्छा. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही सेकंदाला ७.५ किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती कक्षेत फिरत आहोत. माझ्या खांद्यावर असलेला भारताचा तिरंगा मला सांगतो की, तुम्ही एकटे नाहीत, या प्रवासात सर्व भारतीय तुमच्या बरोबर आहेत. ही केवळ माझ्या एकट्याच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील प्रवासाची सुरुवात नसून, भारताच्या अवकाश कार्यक्रमाची सुरुवात आहे. देशातील सर्व नागरिकांनी या प्रवासाचा भाग व्हावे, ही माझी इच्छा. – शुभांशू शुक्ला, अंतराळवीर