अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता आयोजकांनी देशभरातील रामभक्तांना २२ जानेवारी रोजी आपापल्या परिसरातील राम मंदिरात जाऊन पूजा करण्याचं आवाहन केलं आहे. एकीकडे अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी प्रशासन चोख बंदोबस्त करत असताना दुसरीकडे राम मंदिर सोहळा आयोजकांकडून इतर बाबी पार पाडल्या जात आहेत. या सोहळ्याला बोलावण्यात आलेल्या आमंत्रितांना दर्शनानंतर ‘टोकन गिफ्ट’ दिलं जाणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, २२ जानेवारीच्या सोहळ्यासाठी आमंत्रित पाहुण्यांना राम मंदिरातील दर्शनानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून टोकन गिफ्ट दिलं जाणार आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, २२ जानेवारी रोजी अयोध्येत ११ हजाराहून अधिक आमंत्रित उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अयोध्येत येणाऱ्या या पाहुण्यांना सनातन सेवा न्यासाच्या वतीने हे गिफ्ट देण्यात येणार आहे. त्यासाठी सनातन सेवा न्यासाचे पदाधिकारी शिवम मिश्रा यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.
काय आहे हे टोकन गिफ्ट?
या वृत्तानुसार, टोकन गिफ्टमध्ये प्रसाद आणि प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित काही वस्तूंचा समावेश असेल. यात दोन बॉक्स असतील. एका बॉक्समध्ये प्रसाद असेल. यात बेसनाचा लाडू आणि तुळशीचं पान असेल. दुसऱ्या बॉक्समध्ये प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित वस्तू असतील. त्यात राम मंदिर भूमीपूजनावेळी खोदण्यात आलेली माती, अयोध्येतील माती आणि शरयू नदीचं पाणी यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त या बॉक्समध्ये एक ब्रासची प्लेट आणि चांदीचं नाणं असेल.
आमंत्रितांमध्ये मजुरांच्या नातेवाईकांचाही समावेश
दरम्यान, या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या ११ हजार आमंत्रितांमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी झटलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. मजुरांच्या नातेवाईकांनाही सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.