मुंबई : पक्षाचा राजीनामा दिलेले गुलाम नबी आझाद यांनी वर्षांनुवर्षे  कशी पदे  उपभोगली यासह विविध आरोप काँग्रेसकडून होत असतानाच पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा आणि भूपेंद्रसिंह हुड्डा या जी -२३ गटातील तीन नेत्यांनी आझाद यांची भेट घेतल्याने पक्षात चलबिचल सुरू झाली आहे. आझाद यांची भेट घेतली तरी पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांच्यावर शरसंधान करीत गुलाम नबी आझाद यांनी गेल्या शुक्रवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेसने आझाद यांच्या विरोधात मोहीमच उघडली आहे. आझाद यांनी राहुल गांधी यांच्यावर राजीनामा पत्रात केलेले आरोप आणि त्यानंतर पक्षाकडून आझाद यांच्यावर होणारी टीकाटिप्पणी तसेच आरोप यानंतरही पृथ्वीराज चव्हाण, हुड्डा आणि शर्मा यांनी आझाद यांची भेट घेतल्याने पक्षात वेगवेगळी चर्चा सुरू झाली. आझाद यांच्या राजीनाम्यापूर्वी शर्मा यांनीही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याने हिमाचल काँग्रेसमधील छाननी समितीच्या अध्यक्षपादाचा राजीनामा दिला होता. ‘या भेटीची काँग्रेस नेतृत्वाला पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर दोन्ही बाजूने होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे कटुता निर्माण झाली आहे. यातून पक्षाचेच नुकसान होते. यामुळेच कटुता वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती आझाद यांना करण्यात आली, असेही चव्हाण यांनी सांगितले.

गेली दोन वर्षे आम्ही सर्व नेते पक्षाच्या कारभारात सुधारणा व्हावी म्हणून सातत्याने संपर्कात होतो. यातूनच गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आझाद यांची भेट घेतली तरी त्यांच्याबरोबर आगामी राजकीय वाटचाल करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. काँग्रेस सोडण्याचा कसलाही विचार मनात नाही. फक्त पक्षाच्या कारभारात सुधारणा व्हावी एवढीच अपेक्षा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.